शेवटचं पान
शेवटचं पान
सुंदर कविता सुचली त्यादिवशी
वहीच्या मागच्या पानावर
तिच्या आठवणीत,
हातावर हणूवटी ठेऊन
तिची वाट आणि
त्या रिमझिम पावसाला खिडकीतून पाहत.
अनेक भास झाले तिच्या आसपासच असण्याचे
मातीच्या त्या शांत सुगंधाने.
मी नजर शून्यात ठेऊन
फक्त तिचाच विचार करत होतो
आणि लिहीत होतो एक एक ओळ
वहीच्या मागच्या पानावर
भरत आलेलं आता मागचं पान आता
एक एक ओळ लिहून
ती काही शेवटी आलीच नाही
पाऊस सुद्धा निघून गेलेला आता
तिची वाट बघुन
त्याच विरहात मग केली सुरुवात
कवितेची शेवटची ओळ लिहायला
तेवढ्यातच आले शिक्षक बाजूला
टर्रकन फाडलं माझ्या कवितेचं
मागचं पान
आणि जोरात धमाका दिला पाठीवर
आलो भानावर तिच्या आठवणीतून मग....
ती अर्धवट राहिलेली कविता
तशीच कचर्याच्या डब्यातून वाकुल्या दाखवत होती
पण मला मात्र एक नवीन शेवटचं पान देऊन गेलेली
नव्या कवितेसाठी...
