शेकोटी
शेकोटी
कमनशीब तुझे पोरा
रस्त्यावरच बघ फुलले
कडाक्याच्या थंडीतही
हसू चेहऱ्यावर खुलले
मायलेकराची असे या
वस्ती ही पदपथावरची
ऊन वारा पाऊस थंडी
सोयच नसे निवाऱ्याची
प्रतिकूल परिस्थितीतही
नाही त्यांच्या डोळांआसू
जगावे स्वैर स्वच्छंदी जीवन
दिसे तोंडावर निखळ हसू
घ्यावा संदेश सानथोरांनी
या गरीब मायलेकरांकडून
देवाजीने दिले सुंदर जीवन
जगावे मत्सर, द्वेष सोडून
पेटवली शेकोटी पदपथावर
हास्य विलसतेय पहा तोंडभर
थंडीच्या अशा कडक लाटांनी
ऊबीचे समाधान मिळे क्षणभर
