STORYMIRROR

Mrudula Raje

Others

4  

Mrudula Raje

Others

शब्दांचा अबोल स्पर्श

शब्दांचा अबोल स्पर्श

1 min
339

मूक झाले शब्द जेथे, अबोल स्पर्श जाणवे शब्दांचा |

जाणिवेच्या स्पंदनात विरघळे, गंध अबोल स्पर्शाचा ॥


झुळूक एक वाऱ्याची हलकी, खिन्न मनाला देई उभारी।

स्पर्श तिचा जरी अबोल, करतो शब्दावाचून किमया सारी॥


अबोल, अस्फुट, भाव जागवी, एखादी सुंदर चित्रकथा।

निसर्गाचे उदात्त दर्शन, घडवी तिमिरातून विद्युल्लता॥


एक कोवळे फुल उमलते, रोज आपल्या अंगणामध्ये।

स्पर्श - सोहळा नजाकतीने, भाव गुंफितो मनामध्ये॥


पक्षी घेतो लकेर सुंदर, तान त्याची स्पर्शते मना।

शब्द कुठे, तो केवळ सुस्वर, बरसून जाई आनंदघना ॥


सूर्य - चंद्र जे रोज उगवती, कधी साधिती संवाद?।

तेज तयांचे नित्य शिकवते, घ्यावा जीवन - आस्वाद ॥


शब्द कधी का कोणी ऐकला, ईश्वराच्या मुखातुनी।

जाणवतो परी अणूरेणूला, स्पर्श तयाचा हृदयातुनी॥


मन हे उत्कट, तरल असे हे; घेई ठाव अंतरंगाचा।

शब्दावाचून जाणवतो त्याला, अबोल स्पर्श हा शब्दांचा।।


Rate this content
Log in