सचिन महात्म्य
सचिन महात्म्य
रचल्या तू बाबा । विक्रमांच्या राशी ।
शब्द माझ्यापाशी । थिटे थिटे ॥
दाही दिशातुन । कौतुकाचे शब्द ।
सारे सारे लुब्ध । तुझ्यावरी ॥
कल्पक नेतृत्व । अफाट कर्तृत्व ।
यशाचे पितृत्व । तुझ्याकडे ॥
अचाट विक्रम । डोंगर धावांचा ।
मोठ्ठाल्या नावांचा । केला फडशा ॥
विक्रमांची यादी । किती तुझी थोर ।
एव्हढासा पोर । कीर्तिवान ॥
गोलंदाज किती । 'निर्घृण' फोडले ।
चेंडूला धाडले । कुठे कुठे ॥
आकाश ठेंगणे । घेता तुझा बळी ।
खुले त्यांची कळी । सुटलो म्हणे ॥
लेखकाच्या घरी । आश्चर्याचा जन्म ।
ठेवा हा आजन्म । देशाचा हो ॥
निष्ठेने साधना । कठोर प्रयत्न ।
भारताचे रत्न । सचिन हे ॥
