सौभाग्याचे लेणे
सौभाग्याचे लेणे
लग्न म्हणजे पवित्र बंधन
अशी जन्मोजन्मीची गुंफण
आयुष्याचा अनमोल ठेवा
अविस्मरणीय अतुट क्षण..
सनी चौघड्याच्या सुरात
नवजीवनी पदार्पण
मंगलदिनी मंगलसमयी
सरितेचे सागराला तर्पण..
ओल्या हळदीचा संग
फुलवी मेहेंदीचा रंग
गोऱ्या गाली लाल गुलाब
बहरती नवंनात्यांचे नवरंग..
सप्तपदीचे ऋणानुबंध
सहजीवनाचा घाली मेळ
नवस्वप्नांचा नवानुबंध
मोहरे भातुकलीचा खेळ..
आनंदी मिलनाचा सोहळा
दोन मने जुळण्याचा
मंगलाष्टके सुरु होता
कातर जीव आईबापाचा..
लेक जाई माहेर सोडूनी
स्वीकारी नवसंस्कृतीचे कडे
सुखात राही सासर जोडूनी
गिरवी जबाबदारीचे धडे..
जीवनवेलीचे हळूवार पान
प्रारंभी करती प्रेमशृंगार
सौख्याची उभारूनी कमान
मिळवी सौभाग्याचे दान..
