रक्ताळलेल्या मनात
रक्ताळलेल्या मनात
रक्ताळलेल्या मनात एक स्वप्न वाहून गेलं
मलाही माणूस म्हणून जगायचं होतं
पण, एका अस्पृश्याचं,
माणूस म्हणून जगणं राहून गेलं ||0||
आमच्या मनाचे लचके तोडताना
वेदनेचा पूर यायचा
अश्रूंचा बांध फुटला तर
दाटून उर यायचा
अश्रूंच्या या नदीत
सारं जीवनच न्हाऊन गेलं
मलाही माणूस म्हणून जगायचं होतं
पण, एका अस्पृश्याचं,
माणूस म्हणून जगणं राहून गेलं ||1||
मेंदूला जाग आलीच तर
संतापाची लाट उसळायची
ती लाटही ओसरायची
जेंव्हा पोटात भुकेची आग जळायची
हे मनाचं अपंगत्व
जिवनाची वासलात लावून गेलं
मलाही माणूस म्हणून जगायचं होतं
पण, एका अस्पृश्याचं,
माणूस म्हणून जगणं राहून गेलं ||2||
माझ्या पाऊलखुणाही
माझ्यासारख्याच लाचार होत्या
त्यांचं जीवनही दोन सेकंदाचाच
त्याच माझा आधार होत्या
कमरेच्या केरसुणीने
त्यांचं जीवनही झाडून गेलं
मलाही माणूस म्हणून जगायचं होतं
पण, एका अस्पृश्याचं,
माणूस म्हणून जगणं राहून गेलं ||3||
