रात्र कोजागिरीची
रात्र कोजागिरीची
रात्र कोजागिरीची
आली शरदाची पौर्णिमा, आली हासरी कोजागिरी।
श्रीकृष्णाला भेटण्या, प्रिय सखी राधा होतसे बावरी॥
धाव घे यमुनातीरी, तिज साद घालितो श्रीहरी ।
व्याकुळ करिते मनास तिच्या, ती श्रीरंगाची पावरी॥
धावली, धावली राधा; अधीर ती गाठिते कुंजवना।
टिपूर चांदण्या प्रकाशात ती शोधिते मनमोहना॥
रात रुपेरी, चंद्र नभांतरी, रास रचितो श्रीहरी।
गोपगोपिका फेर धरिती, टीपरीवरी पडे टीपरी॥
नाच नाचिती गोपगोपिका,परी दिसेना कान्हा तिथे।
वृंदावनी ती शोधुनी आली, हरवला प्राणसखा कुठे॥
हळूच येऊन, डोळे झाकून, वदला श्रीरंग तिला।
प्राणप्रिये तव अंतरात मी, का शोधिते बाहेर मला॥
उजळली ती पूनव रात, अन् तेजाळली कोजागिरी।
एकरूप ते कृष्णराधिका, गुंजते मुरलीधराची बासरी॥
