रानमेवा
रानमेवा
1 min
680
मित्रांसोबत रानामध्ये
सुट्टीच्या दिवशी जावे
खट्टा मिठ्ठा रानमेवा
मस्त पोटभरुन खावे
हिरव्यागार रानामध्ये
आंब्याचं मोठ झाड
सोबतीला उभा तिथे
एक उंचच उंच माड
काकडी मका गाजर
हरबऱ्याचे ताजे डहाळे
गोड गोड ऊस आणि
मोठे पाणीदार शहाळे
उंच उंच फांद्यांवरती
गाभुळले चिंच आकडे
सरसर चढा रे झाडावर
जशी चढतात माकडे
कैऱ्या बोरं जांभूळांन
गच्च भरलेली झाडं
दगडांनी नेम धरतात
दोस्तमंडळी ही द्वाडं
गावरान लज्जतदार
काळ्या रानचा मेवा
रसरशीत चविष्ट असा
निसर्गाने जपला ठेवा
मित्रांसोबत मनसोक्त
रानमेव्याची चव चाखू
निसर्गाची संपत्ती ही
साऱ्यांनी मिळून राखू!!!
