राजे
राजे
मुजरा करतो राजे,
आपण आसनस्थ व्हा
बेकितल्या एकीचा
आपला महाराष्ट्र पहा
तो पहा मावळा,
किती जोशात जयजयकार करतोय
कदाचित तो तिथीचा भक्त दिसतोय
आणि तो पहा दुसरा,
मागून नाक मुरडतोय
बहुतेक तो तारखेचा सक्त दिसतोय..!!
पण आपलेच भक्त आहेत महाराज
मात्र मतभेदाने बिथरलेले दिसतात
लाटेवरचे स्वार सारे,
इतस्त: विखुरलेले दिसतात
जसे कधी तुमच्या काळात विखुरले होते
निजामशाहीत आणि मुघलशाहीत
ते अजूनही तसेच आहेत
एकमेकांच्या जीवावर उठलेले
आताच्या गोंडस लोकशाहीत, पक्षशाहीत..!!
तुम्ही दिला नव्हता थारा कधी,
कोणत्या जातीला आणि कोणत्याच धर्माला
एक एक निष्ठावान मावळा जमविला
अन् साद घातली महाराष्ट्राच्या ऐक्याला
अशक्य ते शक्य,
तुम्ही करून दाखविले राजे
अटकेपार भगवा फडकला..
आणि मराठेशाहीचा गौरवशाली इतिहास
सुवर्णाक्षरांनी लिहला गेला..!!
आता
त्याच इतिहासाची पानं उगाळून,
आजचा मावळा,
तुमच्या नावाचा टिळा आपल्या रंगात मिसळून,
माथ्यावर लावून घेतोय
ऐक्याची दरी रुंदावत चाललीय
अन्
उभा महाराष्ट्र विस्तवावर चालतोय
पण
दखल कोण घेतोय?
जो तो केवळ स्वार्थ पाहतोय
पण इतकं मात्र खरं राजे
की तुमच्या जयजयकाराने
अवघा महाराष्ट्र दुमदुमतोय..!!
