पुन्हा जावं वाटतं बालपणात
पुन्हा जावं वाटतं बालपणात
बालपणी मनसोक्त खेळणं होतं
रडणं, हसणं एक तरी धपाटा खाणं होतं
गावभर सैरभैर उंदडणं होतं
किती मजा होती ती खोड्या काढण्यात
पुन्हा जावं वाटतं त्या बालपणात..!!
वडाशी सुरपारंब्या खेळत लटकणं
जणू झोपाळाच तो म्हणून झुलणं
फुलपाखराच्या मागे मागे धावणं
किती छान जाई दिवस आनंदात
पुन्हा जावं वाटतं त्या बालपणात..!!
मित्रांवर उगाचच रागावणं होतं
कट्टी घेऊन लगेच बट्टी घेणं होतं
एकच खेळणीसाठी भांडणं ही होतं
पण मजा होती खाऊ वाटून खाण्यात
पुन्हा जावं वाटतं त्या बालपणात..!!
पावसाच्या सरीत चिंब भिजणं
कागदाच्या होड्या पाण्यात सोडणं
सुंदर होतं ते बालपणीच जगणं
सारे क्षण असेच टिपून रहावे मनात
पुन्हा जावं वाटतं त्या बालपणात..!!
