परतफेड
परतफेड
परतफेड होईल तरी का....?
गर्भात घेतलेल्या त्या श्वासाची
आई वडिलांच्या संस्काराची,
वात्सल्याची अन् ऋणांची
भावंडाच्या त्या प्रेमाची
मित्र-मैत्रिणीच्या मायेची..?
परतफेड कशी करावी...?
डोळ्यात तेल घालून
सांभाळलेल्या आईपणाची
जीव तोडून जबाबदारीने केलेल्या संगोपनाची..?
काहीच कमी पडू नये
म्हणून झटणाऱ्या जन्मदात्यांची
दिवस-रात्र घाम गाळून वडीलांनी उपसलेल्या कष्टांची..?
वेळोवेळी मार्गदर्शन करून धैर्य उंचावणाऱ्या आप्तेष्टांची
विद्या मंदीरात ज्ञान घेतलेल्या गुरूजनांची...?
संकटकाळी मदतीचा हात पुढे करणाऱ्या मित्र परिवाराची..?
परतफेड कशी करावी...?
वेळोवेळी सुख-दुःखात कायम
साथ देणाऱ्या जीवन साथीची
आयुष्याच्या चढ-उतारांमध्ये आधार देणाऱ्या कुटुंबाची...?
परत फेड नसते कधी झाडे, हवा,पाणी
निस्वार्थपणे अर्पण करणाऱ्या निसर्गाची
परतफेड होईल पैशाची
नाही त्या मागच्या भावनेची
परतफेड होईल उपकाराची
नाही होणार संस्काराची..
म्हणूनच आपल्या जीवनात
असू द्यावे सत्कर्माचे वेड
त्याच कर्माची मिळते
आपल्याला पुन्हा परतफेड
नाते मैत्रीचे असो किंवा रक्ताचे
नसावी वृत्ती उपकाराची
असावी जपणूक आणि साठवण आपुलकीची
परतफेड म्हणून साद असावी फक्त प्रेमाची....
