प्रतिबिंब
प्रतिबिंब
इवल्याशा जीवाने वेगळ्या विश्वात रमवलं
जणू काही आयुष्यात खुप काही कमावलं
आनंदाला सुरमयी कोकीळेगत उधाण आलं
म्हणून फक्त तुझ्याचमध्ये मी माझ प्रतिबिंब बघितलं..!
स्वर्गातील परीला जमीनीवर अनुभवलं
नभातील चांदणीला जवळून न्याहाळलं
पावसाच्या सरीत मन ओलेचिंब भिजलं
म्हणून फक्त तुझ्याचमध्ये मी माझ प्रतिबिंब बघितलं..!
रडण्यातील हुंदक्यात बालपण आठवलं
मिचमिचणार्या बदामी डोळ्यात विश्वच सामावलं
नाजूक अबोल भावनांत देहभान हरपलं
म्हणून फक्त तुझ्याचमध्ये मी माझ प्रतिबिंब बघितलं..!
मनाच्या अंतरंगात पारिजात दरवळलं
मोराच्या पिसार्यागत आयुष्य फुलवलं
नव्या नवरीगत नवजीवनाचे उपवन सजवलं
म्हणून फक्त तुझ्याचमध्ये मी माझ प्रतिबिंब बघितलं..!