प्रेमाचे प्रतिक
प्रेमाचे प्रतिक
माझ्या वीर जवाना सांग
अजून किती करू तुझी प्रतीक्षा
नको देऊस मज सैनीका
तुझ्या विरहाची एवढी शिक्षा.......
बोल मनसोक्त कधीतरी तू
थोडा वेळ काढून माझ्याशी
मला ही करायचे आहे रे
हितगुज खूप सारं तुझ्याशी.......
सांगावे म्हणते तुला गुपित काही
आहे जे हर्ष माझ्या मनात
तू म्हणतो नेहमीच...सीमेवर आहे
बोलू आपण कधीतरी निवांत........
माझ्या हृदयातील उत्साहाला
तुचं सांग कशी करू मी शांत
तुझ्या प्रेमाचे गोंडस प्रतिक
वाढत आहे वीरा माझ्या उदरात.......
काढतो तो ही आठवण तुझी
हळूच मारून पायाने टिचकी
तुचं लाव गणित..किती वेळा
लागत असेल वीरा तुला उचकी.....
आता तरी सांगशील ना मज
तुझ्या येण्याची निश्चित वेळ
वाट पाहत आहे माझ्या सह
पोटातील आपले इवलेसे बाळ.......
देशाला समर्पित आयुष्य तुझे
जाणीव आहे तुझ्या भार्याला
बघ तुझा छोटा सैनिक ही करतो
ठोकून सलाम तुझ्या कार्याला........
