बाप माझा स्वाभिमानी
बाप माझा स्वाभिमानी
माझा बाप आहे शेतकरी
याचा आहे मला अभिमान
फाटक्या कपड्यात दिवस काढतो
पण जपतो स्वतःचा स्वाभिमान......
उन्हातान्हात घाम गाळून
मिळवतो दोन वेळची भाकरी
कष्ट करणे त्याच्या अंगी
करतं नाही कुणाची चाकरी......
उघड्यावर निजतो छाती ठोकून
ती काळी माती त्याची आई
पायात चप्पल नसताना ही
हिंडतो रानात अनवाण्या पायी......
पावसात भिजतो तरी नसते
डोईवर त्याच्या छप्पर
सगळ्याच ऋतूंचे झळ सोसून
झाला आहे बाप माझा खापर........
झुकत नाही उगाच कुणासमोर
तो आहे फक्त भूमातेचा ऋणी
दुःखाच्या लाटात ही उभा खंबीर
असा बाप माझा स्वाभिमानी.......
