प्रेम शोधा नवं नवं
प्रेम शोधा नवं नवं
माणसाचं माणसाशी
माणुसकीचं नातं हवं
दुःख विसरा चिघळलेलं
आणि प्रेम शोधा नवं नवं ||0||
चेहऱ्यावर दुसऱ्यांच्या
हास्य निर्माण करून बघा
जीवन नाशवंत आहे
प्रेम रंग भरून बघा
एकच भावना मनी असावी
तुमच्या अत्त दीप भवं
दुःख विसरा चिघळलेलं
आणि प्रेम शोधा नवं नवं ||1||
प्रत्येक वेळी जिंकण्याची
सवय जरा सोडून बघा
दुसऱ्यासाठी हरून जरा
रीत ही मोडून बघा
पुसून जरा बघा तुम्ही
डोळ्यांची ओली आसवं
दुःख विसरा चिघळलेलं
आणि प्रेम शोधा नवं नवं ||2||
जात, धर्म, संप्रदाय
पंथ, समाज, समुदाय
गन, चाकू, अणुबॉम्ब
व्यर्थ आहे सामुराय
अभिप्रेत काय आहे
व्यर्थ हा सारा तांडव
दुःख विसरा चिघळलेलं
आणि प्रेम शोधा नवं नवं ||3||
मरणानंतर जिवंत
राहणं एक कला आहे
इतकंच जगाने म्हणावं
माणूस मात्र भला आहे
जीवानिशी मारून टाका
क्रूर मनातला दानव
दुःख विसरा चिघळलेलं
आणि प्रेम शोधा नवं नवं ||4||
माणसाच्या मनामध्ये
ईश्वर शोधावा लागेल
प्रेमाचा हा ओलावा
मनात खोदावा लागेल
देव नंतर बना तुम्ही
प्रथम जरा व्हा मानव
दुःख विसरा चिघळलेलं
आणि प्रेम शोधा नवं नवं ||5||
