पिता
पिता
पिता म्हणजे असा आधारवड
जो स्वतः उन्हाच्या झळा सोसतो
पण आपल्या लेकरांना मात्र
सुखाची शीतल छाया देतो
पिता म्हणजे जणू चंदनच
देह स्वतः चा कण कण झिजवतो
कैक इच्छा मारून स्वतः च्या
जीवनात सुगंध पसरवतो
कितीही मनाला होवोत इजा
अश्रू नयनांतच लपवतो
कष्टाने शरीर थकले तरीही
मुलांसाठी पुन्हा उभा राहतो
तडजोड नेहमीच करून
स्वतः च्या गरजा मारत असतो
खिसा रिकामा असला तरीही
मुलांच्या मागण्या पुरवत असतो
खचतो कधी, हतबलही होतो
तरीही पुन्हा बळ एकवटतो
जिद्द नव्याने धरून मनाशी
मुलांची स्वप्ने पूर्ण करतो
पाठीवर पित्याचा हात म्हणजे
अंधाऱ्या रात्री चांदण्यांचा मार्ग असतो
पित्याची सोबत आयुष्यभर असणे
हाच मुलांसाठी स्वर्ग असतो