फुले
फुले
फुले, मग ती कुठल्याही ठिकाणची असोत. एखाद्या सुंदर उपवनातली विविधांगी, बहुरंगी गुलाब असोत वा ओसाड माळरानावर सर्वदूर उमललेली, वाऱ्याच्या लयीत माना डूलवणारी रानफुले असोत. "मला फुलांचा टवटवीत असा ताटवा पाहून अजिबात बरे वाटतं नाही, माझ्या मनाला उत्साही वाटत नाही." असे बोलणारा व्यक्ती जगाच्या पाठीवर शोधूनही सापडणार नाही . आणि जर कोणी असे बोललाच तर तो सुमनाचा व्यक्तीच नसावा. फुले रंगाची, गंधाची मुक्तहस्ते उधळण करीत असतात. ताजी टवटवीत नुकतीच उमललेंली फुले पाहून मनात उत्साह संचारतो . मनाची उद्विग्न अवस्था, मनाचा थकवा , नैराश्यभावनाचा विसर पडायला विविधरंगी फुले उपयोगी ठरतात.
उत्साही मनात शालीनतेने जगण्याची उर्मी निपजली जाते. तर निरुत्साही मनाची माणसे शालीनतेच्या जगात असूनही उदास उद्विग्नेमध्ये गुरफटलेली असतात. आजच्या युगात माणसाच्या दैनंदिन जीवनात नानाविध प्रकारच्या समस्या एकापाठोपाठ निर्माण होत असतात. अर्थातच मानवी जीवन समस्यांनी वेढलेला बुरूजच असावा. मात्र या समस्यांचे रूपांतर एखाद्या भक्कम तटबंदीत आणि बुरुजाचा एक भव्यदिव्य दिमाखदार किल्ला बनवता आला तर? आणि या कल्पकतेला मूर्त रुप द्यायचे असेल तर मनात चैतन्यभाव, उत्साह हा तितकाच गरजेचा असतो. आणि त्या चैतन्याला, उत्साहाला पुनर्जीवित करण्यात महत्वाचा घटक ठरतो तो आपल्या मनाचा सकारात्मक दृष्टीकोन. उमललेली फुले पाहून नकारात्मक विचार दूर करता येतात आणि जीवनाकडे सकारात्मकतेने पाहण्याचा दृष्टीकोन विकसित होत जातो.
ज्यांना फुलांच्या उमण्याचा खरा आनंद अनुभवायचा असेल किवा उमललेली फुले आपल्याला कशा प्रकारे आनंदी करू शकतात याचा पडताळा घ्यायचा असेल त्याने एखादे फुलझाड आपल्या घरात, परिसरात कुंडीत लावून फक्त त्याला कळ्या येईपर्यंत संगोपन करून पाहावे. होय कळ्या येईपर्यंतच म्हणतोय कारण त्यानंतर त्या कळीचे फ़ुल होण्याची तुमची आतूरता वाढत जाणार आणि मग आपोआप काळजीही घ्याल. आणि तुमच्या मनात उत्साह सुद्धा संचारलेला असणार.
