पहिला पाऊस
पहिला पाऊस
आज पाऊस पहिला
सारा निसर्ग नाहला
आली तरारुन धरा
धुंद गंध मोहरला ॥
आज पाऊस पहिला
छळे विरही जिवाला
म्हणे सांगतो निरोप
दूर देशी सजनाला ॥
आज पाऊस पहिला
बाहेर आणि आत
वाट पाहता सख्याची
सारे दिन आणि रात ॥
आज पाऊस पहिला
सार्यांसाठीच सोहळा
सार्या जगा करी धुंद
माझ्यासाठी का वेगळा? ॥
आज पहिला पाऊस
वणवा रानचा विझला
माझ्या काळजात आग
तिचा भडका उठला ॥
आज पहिला पाऊस
मुक्त मयुर नाचती
विरहिणीच्या जीवाला
काटे बोचरे टोचती ॥
आज पहिला पाऊस
जणू सुखाचा सोहळा
माझ्या नयनीच्या धारा
ओघळती भळाभळा ॥
आज पहिला पाऊस
धरा गेली रे भिजुनी
माझ्या कोमेजल्या राना
तू ही जा ना भिजवूनी ॥
दाटे धन आभाळीचा
आली मृगाची ही सर
जा रे येऊन साजना
बघ झालासे कहर ॥
