पाऊस
पाऊस
तो पाऊस,
रिमझिम, नाजूक
नि नजाकतीने येणारा
मनाला आल्हाद देणारा
तो पाऊस,
बागडणारा, नाचणारा
नि अवखळ पोराप्रमाणे धावणारा
सरसर येऊन दडी मारणारा
तो पाऊस
प्रेमाचा, प्रीतीचा
नि करुणेचा
सगळ्यांनाच माया लावणारा
तो पाऊस
शौकिनांचा, दिलदारांचा
नि कवींचा
चहा-भजी खात रमणारा
तो पाऊस
कट्ट्यावरचा, नाक्यावरचा
नि टपरीवरचा
सगळ्यांची खबर घेणारा
तो पाऊस
अवकाळी येणारा
भरलं आभाळ रितं करून
पाणी पाणी करणारा
तो पाऊस
रौद्र, हिंस्त्र
नि चिडलेला
महापूर आणणारा
तो पाऊस
कधी न येणारा
कोरड्या दुष्काळात
पाणी न दाखवणारा
तो पाऊस
सतत येणारा
ओल्या दुष्काळाने
रोगराई पसरवणारा
तो पाऊस
पाण्याचा, आठवणींचा
दुःखाचा नि आनंदाचा
माहेरवाशिणीच्या मनात रुंजी घालणारा
तो पाऊस
असाही, तसाही
नि कसाही
तरी हवाहवासा वाटणारा
तो पाऊस
गरीबाचा, श्रीमंताचा
नि मध्यमवर्गीयाचाही
सगळ्यांवर सारखा बरसणारा
तो पाऊस
तुमचा, आमचा
नि देवाचा
चूकभूल असावी म्हणत जीव लावणारा
