पाऊलखुणा
पाऊलखुणा
पाऊलखुणा तुझ्या माझ्या
अशाच इथे राहतील बघ
प्रेमवीरांच्या यादीत प्रेमी
नाव आपलं काढतील बघ ||0||
प्रत्येकाच्या मुखी सखे
आपलीच दोन नावं असतील
आपलीच शपथ घेऊन सखे
जीवांमध्ये जीव फसतील
प्रेमिकांच्या जोडीत आता
आपलीच जोडी पाहतील बघ
प्रेमवीरांच्या यादीत प्रेमी
नाव आपलं काढतील बघ ||1||
स्फूर्ती देईल आपली कथा
त्यांच्या खऱ्या प्रीतीला
सुंदर अर्थ देईल आपली
जोडी आजमितीला
निर्मळ आपल्या प्रेमाच्या
झऱ्यात दुःख वाहतील बघ
प्रेमवीरांच्या यादीत प्रेमी
नाव आपलं काढतील बघ ||2||
अवसान गळेल त्यांचं तेंव्हा
आपली आठवण येईल बघ
प्रत्येक प्रेमी कधी ना कधी
प्रेरणा आपली घेईल बघ
दुःख सारी त्यांची आता
हसतमुखाने साहतील बघ
प्रेमवीरांच्या यादीत प्रेमी
नाव आपलं काढतील बघ ||3||
जन्मोजन्मीची ही प्रीत
असते हे मग कळेल गं
विरहाची भिती मनातून
त्यांच्या आता गळेल गं
ज्वाळांनी आपल्या कथेच्या
मने त्यांची दाहतील बघ
प्रेमवीरांच्या यादीत प्रेमी
नाव आपलं काढतील बघ ||4||
हरणं विसरून जातील आता
जीत होईल प्रेमाची
मिलन दोन जीवांचं होणं
रीत ही होईल प्रेमाची
प्रेमाच्या सागरी अथांग
जोड्या या मग नाहतील बघ
प्रेमवीरांच्या यादीत प्रेमी
नाव आपलं काढतील बघ ||5||
