STORYMIRROR

Bharati Sawant

Others

4  

Bharati Sawant

Others

पाखरांची शाळा

पाखरांची शाळा

1 min
933

वडाच्या झाडावर भरली

पाखरांची एकदा शाळा

अआइई अक्षर शिकायला

सारेच पक्षी झाले गोळा

गुरुजी बनले हिरवे पोपट

विठु विठु जप करत बसले

कावळा आला धापा टाकत

सारे पक्षीगण त्याला हसले

कोकिळा आली गुणगुणत

बोलली शिकवा एक गाणे

जोशातच आले मिठूमिया

गाऊ लागले नवनवे तराणे

एवढ्यात चिवचिव चिमण्या

कलकलाट करतच आल्या

गुरुजींचे बोलणे ऐकायला

पुढे पुढे त्या करू लागल्या

पाय आपटूनच गुरुजींनी

सर्वांना मग गप्प बसविले

साळुंक्यांनी उगा साऱ्यांना

विनोदच करून हसविले

इतक्यात पांढरेशुभ्र बगळे

आले घेऊन डाळिंबाचे दाणे

गुरुजींच्या तोंडास सुटे पाणी

पोट दुखण्याचे करती बहाणे

लांडोरीताई आल्या ठुमकत

बोलल्या नाचू का आता मी

पोपटरावांना पळून जायची

मिळालीच संधीच मग नामी

बोलले पहा सारेजण हा नाच

येतोच परत न्याहारी करून

दंगले सारेच नाच पाहण्यात

गुरुजी पळालेच झाडावरून


Rate this content
Log in