नवी पहाट...
नवी पहाट...
रात सरली सरली
येई नवीन पहाट
पाखरांची किलबिल
कसा आगळाच थाट
पूर्व दिशा ही सजून
घाली केशराचा सडा
शोभे नभाची रांगोळी
तिच्या चमकती कडा
सूर्य येईल हळूच
आता रथात बसून
उमलती गोड कळ्या
उभ्या स्वागता हसून
कुहू कुहू कोकिळेची
नवे तराणे भुंग्याचे
वारा घेई भारी तान
चाले संगीत तयांचे
जुने वर्षही सरले
घाई त्याची घरी जाण्या
सारी सृष्टी आज खुश
नव्या वर्षाला पाहण्या
नव्या वर्षाचे स्वागत
सारे आनंदाने करू
पूर्ण होवोत संकल्प
हीच आस मनी धरू
नव्या वर्षी पूर्ण होवो
सर्व मनातील इच्छा
नव्या वर्षाच्या सर्वांना
आज हार्दिक शुभेच्छा!