निसर्ग
निसर्ग
वृक्षवल्ली, हिरवाई
निसर्गाची रूपे छान
उमलत्या कळ्या, फुले
सुंदरता त्यांचा मान
ताटवाही बहरला
जलधारा आल्यावर
नभी पक्षी विहरला
प्रतिबिंब पाण्यावर
कोकिळेच्या कूजनाने
आम्रवृक्ष तरारला
प्राजक्ताच्या सुगंधाने
आसमंत मोहरला
निळ्या गर्द अंबराने
धरतीला खुणावले
मृद्गंधाच्या अत्तराने
तरुवेली गंधाळले
उंच डोंगरावरून
धबधबा कोसळला
वळणाच्या वाटेवर
गार वारा ओथंबला
पाने, फुले, झाडे, पक्षी
सुंदरता भरणारे
सारे निसर्गाचे साक्षी
प्रफुल्लित करणारे
सरसर येता थेंब
पाते हिरवे नाचले
सळसळ आवाजाने
तरु गोजिरे हासले
उषा, निशा बहरल्या
रवि, चंद्राच्या तेजाने
ऊन, छाया लपंडाव
निसर्गाच्या या खेळाने
फुले निसर्ग किमया
सौंदर्याच्या गर्भातून
झरे वरुणाची काया
दर्दभऱ्या मेघातून
कृत्रिमता नसलेला
निसर्गाचा चमत्कार
श्रद्धाभाव ठेवल्यास
आनंदाचा साक्षात्कार
