निरोप
निरोप
तसं तर नेहमीचेच निरोप देणे
त्याशिवाय का भेटीसाठी पुन्हा पुन्हा तगमगणे!
निरोप द्यायचा म्हटलं की नेहमीच माझी टाळाटाळ
आणि पुन्हा काही विसरलं तर नाही ना,
याची खात्री वारंवार
पुन्हापुन्हा निरोपाचे क्षण का येतात
भेटी अशा मनात घर करून राहतात
कोणताही असू दे निरोपाचा क्षण
कधी असतो सुखद कधी तिथेच रेंगाळते मन
कधी नकोच वाटतं समोर उभं राहून
बाय बाय करायला,
त्या दोन डोळ्यातले अश्रू टिपत,
नेहमीच आवडते मागे वळून पाहायला
निरोप कोणाचाही असो,
निरोपाच्या क्षणांना सजवायला
भेटी पुन्हापुन्हा घडत राहाव्यात,
जाताना हसरे चेहरे खुलवायला
माणसं अशी कधी तुटूच नयेत
भेटीसाठी रुसू नयेत
निरोप देताना सारखीसारखी,
डोळ्यातली आसवं पुसू नयेत!
