STORYMIRROR

Sharad Kawathekar

Others

3  

Sharad Kawathekar

Others

निर्माल्य

निर्माल्य

1 min
12K

हातात काही कळ्या घेऊन 

ती सरळ रेषेत चालतेय

तिला दिसतायत

आजूबाजूच्या बोरी बाभळी 

कुठं यू टर्न तर कुठं राईट टर्नचे बोर्ड 

रोडला विभागणारे डिव्हायडर

तुंबणारी गटारं, बंदिस्त पाईप लाईन 

जुन्या खिडक्या खांबाना बांधालेली नात्यांची लक्तरं

खोट्या चिवटपणाचा अभिमान 

बाळगत लटकत होती 

हे सारं सारं पाहताना

तिच्या अंतर्मनावर ओरखडे पडत होते 

ती सरळ रेषेत चालत होती 

ओरखड्यातलं ताजेपण जपत होती 

रस्त्यातलं गंजलेल फाटक कुरकुरत होतं 

फाटकाबाहेरचं ते गंजलेल मन घेऊन 

अंगावर पडलेल्या वेड्यावाकड्या

अश्रूंच्या डागाला आणि चेहऱ्याला लपवत 

ती क्षणभर तिथंच रेंगाळली

हातातल्या कळ्याकडं तिचं लक्ष गेलं 

कळ्यांची फुलं आणि फुलांचं निर्माल्य 

केव्हा झालं ते तिला समजलंच नाही.

त्या निर्माल्याकडंच पाहत राहिली चालायचं थांबून


Rate this content
Log in