निदान एक तारा हो
निदान एक तारा हो
सूर्य नाही,
निदान एक दिशा दाखवणारा ध्रुव तारा हो
सागर नाही,
निदान खळखळून ओसंडणारा निखळ झरा हो
जीवन एक संघर्ष आहे
हे विसरू नकोस
नीतिमत्तेच्या उतारावरून
कधी घसरू नकोस
मनात फक्त प्रेमाचाच
वास असू दे
मानवतेचाच त्यात फक्त एक
ध्यास असू दे
वादळ नाही,
वादळाची चाहूल देणारा सोसाट्याचा वारा हो
सागर नाही,
निदान खळखळून ओसंडणारा निखळ झरा हो
स्वप्नांच्या मागे धावताना
वास्तवाचं भान असू दे
सत्याच्या मार्गावर चालण्यासाठी
पायात त्राण असू दे
स्वप्न साकार करण्यासाठी
स्वप्न जरूर बघ
पण तुझ्या स्वप्नात
सळसळणारी जान असू दे
तुफान नाही,
निदान तरंग निर्माण करणारा वेगवान भवरा हो
सागर नाही,
निदान खळखळून ओसंडणारा निखळ झरा हो
मदतीसाठी सतत पुढे रहा
अपेक्षा मात्र करू नकोस
दुःखाने ग्रासलेल्यांची
उपेक्षा मात्र करू नकोस
दुःख देणाऱ्यांनाही
माफ करणं शिक
तक्रार न करता
मन साफ करणं शिक
तुफान नाही,
निदान धोक्याची चाहूल देणारा इशारा हो
सागर नाही,
निदान खळखळून ओसंडणारा निखळ झरा हो
