मुंडावळ्या
मुंडावळ्या
मुंडावळ्या बटांच्या, बत्तीस घटांच्या
नारळी सभा मंडपी, हरकून उभे ठाकने।।धृ।।
काळ्याभोर केसासही, बेरीज वयाची नाही
बोलक्या डोळ्यास साही, रुपडे कसे हे देखने।।१।।
काळी नयन बाहुली, पापणीस ती भुलवी
गोर्या गुलाबी फुलास, पुससी खुशाली नेमाने।।२।।
टिकली एवढे जाते, सव्वा मण गोड खाते
दळता दळे बापुडी, सुपास मध उपने।।३।।
करवल्या रिंगा घाई, नथणीस शेंडा बाई
हाती कंकण सजती, बाशिंगास कान उसणे।।४।।
स्वप्ने गुलाबी अंगाशी, घोटाळती जरा अशी
तावून सलाखूनशी, गुलाल उधळे बेताने।।५।।
लाडू करंजी अनारसे, साखर भात बत्तासे
उखाणे बेतले असे, दही दुधात बेदाने।।६।।
निरागस चेहऱ्याने, गाल हसती खळीने
काव्यमय कल्पनेने, सुखावती पै पाहुणे।।७।।
