मुक्त
मुक्त
1 min
345
कशाला पाहिजे संवेदनशील मन,
अस्मिता जागवण्याची सतत वणवण.
कोडगेपणाच्या उबदार अंगरख्यात
का नाही विसावत अशांत अंतर्मन!
विश्वासघाताचे आसूड, सौहार्दाचे मुखवटे
सरळमार्गी आयुष्याला फुटलेले उगीचचे फाटे
न संपणाऱ्या इच्छा, आपणच विस्तारलेल्या गरजांच्या कक्षा,
गरज नसताना ओढूनताणून पैशासाठी द्यायच्या परिक्षा!
खोट्या हुशारीचे आव, फुशारकी मारणारे रंकामधले राव
कसा लागणार इथे खऱ्याचा टिकाव, मामलेदाराच्या वेषात फिरती सगळेच साव!
निवृत्त मन, निरिच्छ मन, स्वच्छंद, मुक्त, उन्मुक्त मन,
गवसेल का मला निरूपाच्या स्वरूपातलं माणसाचं मन?
