मरण सोहळा
मरण सोहळा
चाललाय माझ्या मरणाचा
आज इथे पहा कटू सोहळा
टाहो फोडून रडताना पाझरे
आईबाबांचे अश्रू घळाघळा
जिवंतपणी होतेच ना माझे
सुंदर मोठे हे एक पूर्ण नाव
मृत्यूनंतर नाहीच असे उरले
कोणतेच नाव आणि गाव
जमलेत सारेच नातेवाईक
अश्रूंचा त्यांच्या वाहतो पूर
शुभचिंतन करण्या आलेत
निघाले मी सर्वांपासून दूर
दादा वहिनी भाऊ बहिणी
सर्वांनी बघा काढलाय गळा
सगेसोयरे सारे मित्र-मैत्रिणी
चढवताहेत फुलांच्या माळा
हिरवा शालू साजशृंगार करुन
नटवले मला आज नवरीवाणी
केसात माळूनी हे फुलांचे गजरे
कुणी घातलीय शेवंतीची वेणी
घालूनी शेवटची आंघोळ मला
मळवट भरलाच ना कपाळभर
पाहून साजशृंगार यजमानांनी
फोडला हंबरडाच भररस्त्यावर
उचलली चौघांनी तिरडी माझी
सुरू ही वाटचाल स्मशानाकडे
लेकरे बिचारी ही रडूनी पुसती
साऱ्यांना जातेय आई कुणाकडे
इवल्या जीवांना ठावूक नव्हता
कसला मृत्यू प्रसंगाचा मागमूस
होऊ आपण आईपासून पोरके
करेल कोणी आपली वास्तपुस
करुनी संस्कार परतले आप्त
हे बारा दिवसांचे सुतक सुरू
विसरतील सगेसोयरे गणगोत
बाळांची परवड कशी विसरू
