STORYMIRROR

Pratima Kale

Others

3  

Pratima Kale

Others

मोल कधी कळणार?

मोल कधी कळणार?

2 mins
497

मोल कधी कळणार?

कशी वर्णावी अजब गाथा

ना कळणार कधी मोल कोणा

आख्खं ब्रम्हांड प्रकाशमान करणार्‍या

वंशवेलीची वाताहत पाहून

शोकांतिकाच म्हणावी लागेल

ही स्त्री जन्माची ...

खरंच काही उमजेना

या मानव जातीचे गौडबंगाल

अरे मी देखील तुझ्याच रक्तमांसाचीच ना?

पण फक्त मुलगी म्हणून 

उदरी जन्म घेणे यात माझा काय गुन्हा?

खरंच कळेना मलाही

विधात्या अशी काळजावर 

छिन्नविछिन्न झालेली लक्तरं लोंबावित

तशीच अवस्था लेक म्हणून 

नशिबी आलेली.......

असं म्हणण्यापेक्षा तुच दिलेली

तुला आई पाहिजे,बहिण पाहिजे,

बायको देखील पाहिजे..

पण...

तुझ्याच पोटचा गोळा,तुझी मुलगी नको

असा काय गुन्हा असावा माझा?

कित्येक पिढ्या गेल्या

तरीही हा गुंता काही सुटेना

एवढा तिटकारा लेकीचा का तुला?

अरे किती भोगायचं अजुनही

या स्त्री जन्माचे

रूढी परंपरांनी वेढलेले,

आच्छादलेले कवचकुंडलांचं चक्रव्यूह

विधात्या तुलाही ठाव नसावी का?

ही जन्मोजन्मीची बंधनं

हे नियतीचे साखळदंड

माझ्याच पायात का?

असंख्य प्रगतीची शिखरे गाठताना

पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून

सर्व क्षेत्रात अग्रेसर राहून

तिनेच का झिजायचं?

वेदनेच्या दाहकतेला स्मरून

फक्त अन् फक्त रडायचं

का करावी अशी नीच मानसिकता

या नराधमांनी आमच्याकडून

खरंतर लेक म्हणून बोलतांना

आज शब्दही अश्रूधारांनी 

लाचार झालेत

जिथे जावे तिथे लेकीच्या जन्माचा

खोटा उदो उदो नुसता देखावा म्हणून

कारण वंशवेल स्विकारण्यास

सर्वांचं काळीज आजच्या प्रगत देशातील

मिश्या पिळवटून मिरवणाऱ्या मानवाकडे दिसतंय तरी कुठे?

निदान तिचा गर्भातील हुंकार दडपणाऱ्या

तुझ्या हाताला हीच जाणीव

लकवा मारल्यानंतर कुणी पाणी पाजत नाही ना

तेव्हाच होते

त्याला लेकीच्या जन्माविषयी

मनात असणा-या विषमतेची ती पायरी

मिटवण्याची अक्कल सुचते....

वृद्धाश्रमाची पायरी तर

स्वतः कर्मदरिद्री बापाची रडकहाणी सांगताना

हतबल दिसते

ज्याच्या जन्मासाठी कित्येक लेकींचा गर्भपात केला,

तोच पोटचा गोळा

मायबापाच्या कर्माची फळं भेट देताना

त्यांनाच वृद्धाश्रमात धाडतो

तेव्हा

पश्चातापाशिवाय दुसरे काहीच हाती

लागत नाही

सुखी जीवनाचा खांदा

समतेचा सांधा

एकात्मतेचा बांधा 

अशी एकमेव लेकच असते...

तिलाही स्वच्छंद आयुष्य जगताना

पाखरापरी आभाळात विहारण्याचे

स्वप्न बघून

निळ्या नभाच्या अथांग

पसरलेल्या मखमली शालीप्रमाणे

बहरण्याची,पसरण्याची

अन् तिच्या मर्जीप्रमाणे जगण्याची

संधी देवून

लेकीचा जन्म सार्थकी होण्याच्या दृष्टीने

तिच्या आयुष्यातली गुलामी कायमची

हद्दपार व्हावी

बुरसटलेल्या विचारांची राख व्हावी

लेकीची जीवनवेल

सुजलाम,सुफलामतेची नांदी घेवून बहरतांना

लेक जन्माचे 

गावोगावी गल्लोगल्लीत स्वागत होवून 

जन्म सार्थकी लागो

अशीच प्रेरणा विश्वाच्या कानाकोपऱ्यात

न दिसणाऱ्या हवेप्रमाणे पसरून

लेकीच्या जन्माचे मोल कळून

आजतागायत न कळणाऱ्यांच्या

विचारशक्तीत बदल घडवण्याची

विधाता अफाट शक्ती देवो.........


Rate this content
Log in