मला पुन्हा एकदा शाळेत जायचयं
मला पुन्हा एकदा शाळेत जायचयं


धावत जाऊन माझ्या रोजच्या बाकावर बसायचय..
रोज सकाळी खड्या आवाजात राष्ट्रगीत म्हणायचंय..
नव्या वहिचा वास घेत पहिल्या पानावर छान अक्षरात आपलं नाव लिहायचय..
मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय..
मधल्या सुट्टीत कसाबसा डबा संपवत तिखट मीठ लावलेल्या चिंचा, बोर, पेरु, काकडी सगळं खायचय..
मधली सुट्टी होताच वाटर बॅग सोडुन नळाखाली हात धरून पाणी प्यायचय..
संत्रा लिंबू आणि आईचं पत्र शोधण्यासाठी
मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय..
उद्या पाऊस पडुन शाळेला सुट्टी मिळेल का हा विचार करत रात्री झोपी जायचय..
अनपेक्षित मिळणारा सुट्टीच्या आनंदासाठी
मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय..
घंटा व्हायची वाट का असेना मित्राशी गप्पा मारत
वर्गात बसायचय..
लसावि मसावी वा पायथागोरसची प्रमेय सोडवण्यासाठी..
कुसुमाग्रज आणि बहिणाबाईंच्या कवितांना पुन्हा तीच जुनी चाल लावण्यासाठी. .
मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय..
आताची दुनियादारी बाजूला सारुन शाळेतल्या यारीच्या दुनियेत पुन्हा जगायचंय..
एकमेकांच्या डब्यात हात घालून खाण्याची मजा पुन्हा अनुभवायची आहे ..
पालक मिटींगचा दिवस कसा जाईल या भितीने आदल्या दिवशीपासूनच घाबरायचंय ..
मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय..
कितीही जड असुदे, जबाबदारीच्या ओझ्यापेक्षा दप्तराच ओझ पाठीवर वागवायचय..
पुन्हा तोच पांढरा शर्ट, निळा फ्राॅक,लाल टाय,लाल रिबिन असलेल्या दोन वेण्या बांधून मिरवायचय ..
मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय..