महिमा दत्ताचा
महिमा दत्ताचा
पतिव्रता ऋषिपत्नी अनसुया
ख्यातनाम होती या भूतलावर
कसोटी पाहण्यास या मातेची
आले तिथे ब्रह्मा विष्णू शंकर
अत्रीऋषींच्या अनुपस्थितीत
केले तिने अतिथींचे स्वागत
नग्न होऊनीच भोजन वाढावे
होते अद्भूतच अतिथी सांगत
ओळखले पतिव्रतेने सारेकाही
अंतर्मनाने ईश्वरांचे सत्यस्वरूप
पतीचे स्मरण करून तिने दिले
अतिथींस सान बालकांचे रूप
स्तनपान केले बालकांना तिने
मागणी ही अतिथींचीच मानुन
पातिव्रत्य तिचेही अभंग राहिले
अतिथींचे खरेखुरे रूप जाणुन
प्रसन्न पावले असे अतिथीगण
दिले मातेस त्यांनी मग वरदान
लक्ष्मी सावित्री पार्वती देवींनी
केला सती अनसुयेचा सन्मान
एकरुपात येऊ माते तुझ्यापोटी
वदले मातेला तीनही देवाधिदेव
दत्तात्रयांच्या अवतारात त्यांनी
जन्म घेऊनी मातेस दिली ठेव
श्रीपाद दत्त दिगंबर हेच दैवत
स्वामींची कृपाच असे सर्वांवर
भक्तांना देऊनी कृपेचे वरदान
भ्रमण केले साऱ्यांच चराचरी
