महिला दिन
महिला दिन
पत्नी म्हणाली धास्तीच आहे
आज आमच्य गोटात
नवऱ्याच्या हातचे पदार्थ
जाणार आहेत पोटात
धाडस करून म्हणाली ती
आज काही खरं नाही
आमच्या स्वयंपाक घरातलं
वातावरण फार बरं नाही
भल्या सकाळी अंथरुणातच
हातात देत चहा
तो म्हणाला –‘महिला दिन’
उजाडला राणी पहा ‘
तिचेही डोळे विस्फारले
आश्चर्य दाबले ओठात
नवरयाने केलेला चहा
संपवला एका घोटात
ती म्हणाली चहामधून
जाणवले तुझे प्रेम
स्वयंपाक फक्त करू नकोस
तुझा काय नेम
पुढच्या महिला दिनापर्यंत
शिकवीन तुला छान
शिकवताना मात्र पुरते
तिकडेच द्यायचे ध्यान
नवरा म्हणाला आज तुला
बाहेरच घालतो जेऊ
ती म्हणाली मोकळ्या हवेत
मस्त फिरून येऊ
अधून मधून एकमेकांना
पुरेसा वेळ देणे
याच्याइतके नाही सुंदर
आनंदाचे लेणे
खरेदी आणि बाहेर खाणे
यातच नसते सुख
तुला आनंदी पाहून राजा
उजळते माझे मुख
तूच माझा शालू पैठणी
तूच मोत्यांचा हार
समाधानाचे वरदान मला
हव्यास नाही फार
एकाएकी नवऱ्याच्याही
डोळ्यात दाटले पाणी
घट्ट मिठीत त्याच्या अलगद
विरघळली अन राणी !!
रोजच माझी काळजी घेतो
जपतोस मला किती
महिला दिन नसला तरी
तेच प्रेम प्रीती !
