मैत्रीचे मोल
मैत्रीचे मोल
दोस्तीचे नाते नाजूक खूप
जणू वरण भातावर साजूक तूप
मैत्री ना पाही रंग रूप
प्रेमाचा वाहे झरा ||१||
पण मैत्रीचे महत्त्व होतेय कमी
मैत्रीच तर असे जगण्याची हमी
मैत्रीत नसे तुम्ही आम्ही
आपलेच असती सारे ||२||
मैत्रीची दुरावस्था होतेय
दोस्ती दोस्तांपासून तुटतेय
यारांची यारी हरवतेय
आपणच कारण ||३||
मित्रांना बोलवावे
निवांत का बसावे
Pubg खेळावे
सगळे मिळूनी ||४||
Whatsapp ला मित्रांची धमाल
Insta वर Likes ची कमाल
त्यातच जर रमाल
मिळेल का खरी मैत्री ||५||
Facebook ला मित्र हजार
झाला आपल्याला आजार
खाटेवर एकटाच बेजार
भेटायला कोणी येईना ||६||
मित्र व्यसन लावी
त्याच्या हाती का द्यावी
आपण आपलीच चावी
फरक जाणून घ्यावा ||७||
मित्र जो खर्च करी
तोच सगळ्यात असे भारी
त्याच्याच मागे फिरती सारी
दिलदार मनाचा राजा माणूस ||८||
नडेल त्याला फोडा
दोस्ती म्हणजे राडा
लावा कानाला खडा
सारासार विचार करावा ||९||
मैत्रिणींनी भेटावे
गोड गोड बोलावे
भले बुरे सुनवावे
पाठीमागे ||१०||
वस्तू वाटून घेती
एका डब्यात जेवती
छोट्या भांडणाने दुरावती
अश्या मैत्रिणी काय कामाच्या ||११||
Friendship Day ला एकत्र यावे
Band बांधुनी हात सजवावे
Post नि status टाकुनी गावे
दोस्तीचे गुणगान ||१२||
दोस्तांच्या वाढदिवसाला
तोटा नाही गोंधळाला
Cake फसवा तोंडाला
द्याव्या लाथा बुक्क्या ||१३||
मैत्री दोस्ती नि यारी
सगळे झोलझाल करी
झाली नुसती दुनियादारी
साऱ्यांनाच कळते सारे ||१४||
मैत्री कोणाशी करावी
सांगत कोणाची धरावी
साथ कोणाला द्यावी
असू द्यावे भान ||१५||
मित्र चतुर असावा
त्याने जीव लावावा
प्रसंगी कान ही पिळावा
बापासमान भासे ||१६||
मैत्रीण प्रेमळ असावी
तिने काळजी करावी
संकटाला न घाबरावी
आईच जैसी ||१७||
असे लाभतील ज्यास दोस्त
जीवन त्याचे बनेल मस्त
जखमाही होतील दुरुस्त
नसे कसलीही चिंता ||१८||
मैत्री अशी असावी
तिथे स्वार्थाची गरज नसावी
अहंकाराची चाहूलही न लागावी
निरपेक्ष प्रेमाची निशाणीच जणू ||१९||
मैत्रीचे जाणावे मोल
न जाऊ द्यावा तोल
दोस्तीचा विषयच खोल
जाणुनी घ्यावे ||२०||
