मैत्र
मैत्र
तुझ्या माझ्या मैत्रीच्या रेशीमलडी
मृदुमुलायम
सुखदस्पर्शी
मला भय वाटायचं
रेशीमकिड्यासारखी आतल्या आतच गुंतून पडेन की काय या रेशीमनिर्मितीच्या सोहळ्यात
पण या बाकी सृजनप्रक्रियांप्रमाणेच याही सृजनात आनंदनिर्मितीच अधिक असते
हे आता कळून चुकलं
तसं... भय वगैरे पार नाहीसं झालं
नि मैत्री नावाचं एक अखंड अक्षय दिलासा देणारं अक्षयपात्र हाती लागल्याचंही गवसलं
हे असं काहीतरी फक्त देणारं नातं...
त्याच्या एका टोकाला आपण... नि दुसऱ्या टोकाला... टोकाचा विचार न करता... किंवा टोकेरी शब्दांनी घायाळ न करता..
साथ देणारं...
माझ्या विचारांना आकार देणारं...
माझ्या प्रतिभेला जागृत करणारं...
माझ्यावर अपरिमित विश्वास टाकणारं...
हं... आणि हक्कानं रुसणारंदेखील...
माझ्या मनाच्या जवळचं...
कोणीतरी... ते कोणीतरी... म्हणजे 'तू' असं शब्दातच बांधून सांगायला हवं...
असं मुळी उरलंच नाहीये.
त्या सगळ्या मैत्रीच्या व्याख्या वगैरे वगैरे
गौण...
रक्तापलीकडचं तरीही...
तितकंच अपरिहार्यतेच्या पलीकडे... हवंहवंसं असणारं... मैत्र...
तुझं नि माझं...
खरखुरं मैत्र...
