माझं माहेर माहेर
माझं माहेर माहेर
माझं माहेर माहेर
काय सांगू त्याची गोट
पडे वाटेवर पाय
कशी धावे पायवाट
माझं माहेर माहेर
उभा वाडा चिरेबंदी
किती येती आणि जाती
तिथे कुणा नाही बंदी
माझं माहेर माहेर
गावी दरारा केवढा
असे मायबाप माझे
छान शोभे त्यांचा जोडा
माझं माहेर माहेर
येती भावंडं धावत
आक्का आली आक्का आली
सारी सांगती गावात
माझं माहेर माहेर
दादा वहिनीची माया
माय बापाच्या नंतर
त्यांच्या पडते मी पाया
माझं माहेर माहेर
तिथे कशाचा ना तोटा
कसा ढोरांनी भरला
माझ्या माहेरचा गोठा
माझं माहेर माहेर
ताट आयतं समोरी
राही हातातच घास
कशी असेल हो स्वारी
माझं माहेर माहेर
माझ्या भोवताली सारी
अडकला जीव तिथे
याद येते त्यांची भारी
