माझं कोकण...
माझं कोकण...
प्राजक्ताचा गजरा केसात माळला
वनदेवीने हिरवा शालू ल्यायला
आंबे मोहराचा वास शेतीत दरवळला
माझा कोकण राजा नवरंगी नटला
जागा झाला तो दर्याचा राजा
मुक्त हस्ते उधळती मासोळी ताजा
देवाधर्माचा करत गं गाजा वाजा
सारे सुखी होऊ दे रे महाराजा
श्रावण गात येतो नाचत लाजरा
दुग्ध तो प्रपात अन् खळखळ झरा
झेलती आनंदे पाऊस, वादळ अन् वारा
मन आनंदले पाहून सृष्टीचा खेळ सारा
बोरं,जांभळं, काजू चाखू रानमेवा
काटेरी फणसाचा हृदयात गोडवा
कौलारू घरात झिरपतो मायेचा ओलावा
सुखसमृद्धीचा अनमोल हा ठेवा
इथे जन्मली नररत्नांची खाण
लढली घेऊन शिवबाची आण
लाल मातीची जागवती ती शान
असे चमकते माझे हिरवे तळकोकण.
