माझी माय
माझी माय
वाटेतले बोचरे काटे माय
तुझ्या हाताने सरकवलेस
आमच्या मोठेपणासाठी
तुझे मी पण धूडकवलेस
रिकाम्या पोटानेच झोपलीस
केले नाहीस आम्हां कमी
शिक्षण पूर्ण करण्याची तू
घेतलीस आम्हांकडून हमी
पायावर उभे केलेस आम्हां
दुसऱ्यांचे शिवूनी तू कपडे
नाही वाटला तुला कमीपणा
पाऊल नाही पडणार वाकडे
स्वतः होतीस माय तू निरक्षर
तरी साक्षरतेचा तुजला ध्यास
अहोरात्र राबलीस तू त्यापायी
नाही घेतलास मोकळा श्वास
चंदनाप्रमाणे झिजलीस सदाच
सुगंध पेरल्यास आपल्या घरात
मुलींना सासर घरी पाठवताना
पाहिलीस खुशीने त्यांची वरात
आयुष्यभर सोसलेस तू आघात
शोभलीस आमची कष्टाळू आई
कसे व्हावे ऋणमुक्त माय आम्ही
मिळाली तू आई आमची पुण्याई
