Pratima Kale

Others

2.6  

Pratima Kale

Others

माझे लेख,कविता - प्रतिमा काळे.

माझे लेख,कविता - प्रतिमा काळे.

14 mins
52


 धागा हा रेशीम बंधाचा

 भाऊ बहिणीच्या नात्याचा

 कर्तव्याच्या सदा जाणिवेचा 

 सण मोठा हा उत्साहाचा !


बहिणीचे प्रेम निरंतरच 

रक्षण तिचे करण्यासच

जोडतो मनाला चिरंतरच

धागा हा रेशीम बंधाचाच !


जपते अंतरीचा भावबंध

लावते कपाळी पवित्र गंध

बांधून रेशीम धाग्याचा बंध

सभोवार दरवळे नात्याचा सुगंध !


नाते आपले बहिनभावाचे

अतीव निर्मळ प्रेमाचे

प्राजक्ताच्या गंधासम दरवळायाचे

नित्यमनी आपुल्या जपायचे !


सदा सुखी तुला रक्षते

हेच नित्य मागणे मागते

रक्षाबंधनाच्या खास शुभदिनी पुजते

प्रेमजिव्हाळा जपून तुज ओवाळते !


बहीणभावाच्या प्रेमळ नात्याचा

सण असे रक्षाबंधनाचा

नांदतो घरादारात वासल्याचा 

गुंफूनी धागा ऋणानुबंधाचा !        

________________________________________


 २) विषय - माझे प्रेम 


प्रेम माझे तुझ्यावर

मनसोक्त गंधाळले

क्षण सारे आठवता

मन खोल गुंतलेले !


प्रेम माझे निरपेक्ष

त्यात असे सारा अर्थ

सारे जग बोल बोले

परी त्यात नसे स्वार्थ !


प्रेम मनास उभारी

देते जगण्यास बळ

झंकारते प्रेम नाद

मन गुंते सर्वकाळ !


नको नको म्हणतांना

मन माझे गुंतलेच

सांगू आता कसे तुम्हा

क्षण दिसे अचुकच !


चित्त सारे माझे आता

तुझ्या श्वासातच वसे

मन दर्पणात जणू

कस हसताना दिसे !

________________________________________


३ विषय - साहित्यिक कोहिनूर हिरा आण्णाभाऊ माझा खरा


ऑगस्ट मासाच्या एक तारखेस माझे आण्णाभाऊ जन्मले !


साठेंचे आण्णाभाऊच ,आमचे आता प्रेरणास्थान बनले !


भुक भागवण्याकरिता वाटेगाव ते मुंबई,पायी चालून आले !


पत्नीस गावी ठेवूनी ,दलितांचे कैवारी सर्वस्वी झाले !


जरी निरक्षर असून,स्वतः शिकता लेखन मनी स्फुरले !


जूलमास वाचा फोडूनी, लोककलेतून जनमनाचे पुन: निर्माण केले !


समाजात जगण्यासाठी,अभिमानाचे स्थान बनवले !


एक धगधगता अंगार,बहिष्कृतांच्या काळजाचा हूंकार झाले !


वास्तव जगात कष्टाचे सागर उपसून,दौलतीचे डोंगर घडवले !


आपल्या पोवाड्यातून ,छत्रपतींचे चरित्र सर्व विश्वात पोहचविले !


फकिरातून दलितांच्या वारणेच्या वाघाने,बदल किती केले ! 


आपल्या शाहिरीतून ,नाना चळवळींना योगदान सारे दिले !


आपल्या लेखनीतून, समाजसुधारणा सोबत प्रबोधनही केले !


उभे आयुष्य मुंबईच्या, चिरागगनगर झोपडपट्टीत काढिले !


आण्णाभाऊस किती झाल्या वेदना,तरी का कळल्या नाही जगाले !


डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रखर वाणीने,ऊर्जा देऊन पेटविले !


का कोणास कळले नाही माझे शिवशाहीर , जीवनाच्या साहित्याचे महासम्राट ते झाले! 


साहित्यिक कोहिनूर हिऱ्यासारखे,आण्णाभाऊ माझे खरे चमकले !

_______________________________________

 ४)   चारोळी


जीवन परी जगावे पंकजासमान

येता लाखो संकटे, तरी हास्य फुलवतो

आपुले आयुष्य जरी जाता चिखलात

उमलूनी जगास सुगंध देतो !

________________________________________

५) विषय - कृष्ण 


तुझ्या हृदयाची आस

तुझ्या श्वासाचा श्वास

तुझ्या मनात जागा

खास..समजतोस मला ?


तुझ्या दिवसाचा एक क्षण

तुझ्या रात्रीचं स्वप्न पण ...

तुझ्या त्या स्वप्नातील राजकन्या

पण...समजतोस मला?


तुझ्या आनंदाची साथीदार

तुझ्या दुःखात भक्कम आधार..

तुझ्या वेदनेची ...

हिस्सेदार.. समजतोस मला?


तुझ्या आरतीचा निरांजन

तुझ्या प्रार्थनेतल भजन..

तुझ्या प्रकाशाचं..

आसन..समजतोस मला?


तुझ्या जगण्याचं कारण

तुझ्या आशेचा किरण....

तुझ्या भावभावणाचां....

कण..समजतोस मला?


तुझ्या जीवनाची शिल्पकार

तुझ्या कष्टाची भागीदार..

तुझ्या यशाची..

दावेदार...समजतोस मला ?


तुझ्या आयुष्यात मी राधा आहेस 

तुझ्या जीवनात बासरी वाजवतेस.... 

तुझ्या डोक्यातील कृष्णाचं.....

मोरपीस ...समजतोस मला ?

 _______________________________________

६)    प्रेम....


प्रेमाला नाही देता येत कशाची उपमा,प्रेमाला नसते कोणती भाषा.

प्रेम दिले तर प्रेमच मिळेल हीच माझी अभिलाषा !


प्रेमात नसतात कोणत्या अपेक्षा,प्रेम हीच आशा

निरपेक्ष प्रेम नाहीतर निराशा !


प्रेमात करू नका व्यवहार , न कोणताही परपोकार

नका करू प्रेम,कोणाचे फेडण्यास उपकार !


प्रेम व्हावे क्षणात,मने तुमची जुळता 

नयनी दिसतो प्रेमभाव,स्पर्श अंर्तमनाचा होता !


प्रेमात असतो आदर,नसतो कोणता स्वार्थ

लोभ,मत्सर,अहंकार,दूर सारून गाठावा परमार्थ !


निरपेक्ष,निस्वार्थी प्रेमासाठी ,लागत नाही दौलत

मिळते त्याला ,ज्याच्यात प्रेम करण्याची असते हिम्मत! 


जन्मोजन्मीच्या प्रार्थनेनंतर,होती पूर्ण तुमची आस

जरी रुक्खमीनी असे भ्राता,पण चित्ती वसे राधा कृष्णाच्या खास !

________________________________________

७) काव्यबत्तीशी काव्यलेखन


चिंब श्रावणसरी

कोसळता आठवतात

आता त्या आनाभाका

क्षणोक्षणी रे स्मरणात ||१||


तुला भेटण्यासाठी

मन किती आतुर झाले

तुझ्या रे प्रेमातच

चिंब सारं भिजून गेले ||२||


तुझा पहिला स्पर्श

श्वास श्वासात रे गुंतता

प्रीतीतच दाटली

मन उल्हासाने फुलता ||३||


याच श्रावणसरी

नियमित बरसाव्यात

आता प्रेमींसाठीच

भुवरीच साऱ्या याव्यात ||४||  


याच आतुरतेत

वेगळाच एक प्रपंच

आठवणी देतात

प्रेमाचाच धुंद स्पर्शच ||५||

________________________________________

८) विषय - माझे शिक्षक

 

  " गुरुब्रम्हा,गुरुविष्णु,गुरुदेवो महेश्वर: |

   गुरु: साक्षात परब्रम्हा, तस्मै: श्री गुरुवे: नमः |"


      आपल्या भारतीय संस्कृतीत शिक्षकांना खूप वंदनीय स्थान दिले जाते.शिक्षक केवळ विद्यार्थ्यांना जगाच्या गोष्टीबद्दल माहिती देत नाही ,तर स्वतः चे शिक्षण व ज्ञान विद्यार्थांच्यात वाटून घेतात.विद्यार्थ्यांसाठी अध्यात्मिक मार्गदर्शक म्हणूनही कार्य करतात. ते त्यांना सत्य ,प्रकाश,चिरस्थायी शहाणपण आणि सर्व गुणांच्या मार्गावर घेऊन जातात.

      शाळेत एकदा दाखल झाल्यावर अनेक शिक्षकांचा आपल्याला सहवास लाभतो. त्यांच्या सोबतच आपले आयुष्य जाते.त्यातील खूप शिक्षक आपल्या नेहमी स्मरणात राहतात व मनपटलावर तर कायमचेच कोरले जातात.

       माझ्या चिरकाल स्मरणात राहिले ते आमचे 'खेमनर सर .' आमच्या सरांचे अनोखे व्यक्तिमत्व आहे.ते स्वभावाने खूप कडक असले तरी पण निसर्गासारखे शांत,मनमिळाऊ आहे.ते आम्हाला गणित व विज्ञान शिकवत.मला त्यांची शिकवण्याची पद्धतच खूप आवडत.

      आम्हाला जर एखादा मुद्दा समजला नाही तर ते आम्हाला उदाहरणे देऊन समजावतात व जो पर्यंत ते आम्हाला समजत नाही तो पर्यंत समजून सांगत.आमच्या शंका विचारण्यास प्रोत्साहनही देत.अभ्यासात गोडी आणण्यासाठी,अभ्यासाकडे आपले लक्ष वेधण्याकरिता ते शिकवताना मजेशीर चुटकले,गोष्टी,कोडे सांगत.शिकवून झाल्यावर ते नेहमीच काही प्रश्न विचारत जेणेकरून आम्हाला तो भाग किती आकलन झाला हे त्यांना त्यावरून समजत.

    

    'शिक्षक म्हणजे एक समुद्र

    ज्ञानाचा,पावित्र्याचा....    

    एक आदरणीय कोपरा..

    प्रत्येक व्यक्तीच्या मनातला..

    शिक्षक, अपुर्णला पूर्ण करणारा..,

    शब्दांनी ज्ञान वाढविणारा...

    शिक्षक, जगण्यातून जीवन घडवणारा...

    तत्वातून मूल्ये फुलवणारा.'


    सरांचा गणित व विज्ञान या विषयात चांगलाच हातखंडा होता .विज्ञान विषय किती कठीण व कंटाळवाणा आणि गणित तर खूपच भीतीदायक ! पण आमच्या सरांचे कौशल्य असे जबरदस्त होते की,हे विषय कधी आम्हाला कंटाळवाणे वाटले नाहीत व त्यांची भीतीही कधी वाटलीच नाही .

      घरगुती प्रसंगातील उदाहरणे देत ते सहज अभ्यासाकडे वळत. विज्ञानाच्या तासिकेच्या वेळी ते स्वतः प्रयोगशाळेत प्रयोग करून दाखवत त्यानंतर आम्हाला स्वतः ला करायला लावत. अनुभवातून शिकणे गरजेचे असते असे मत सरांचे होते .आपण हा प्रयोग का करतो ?त्याचे महत्त्व,तत्व,कारणमीमांसा करणे, निरीक्षण,अनुमान करणे हे सगळे आम्हालाच करायला सांगत.

      अनेकदा शास्त्रज्ञांच्या आयुष्यातील प्रयोग करताना धडपडीचे प्रसंग रंगवून सांगत आणि त्यासोबतच अनेक सिंध्दांत गप्पाच्या,चर्चेच्या स्वरूपात शिकवत.सर गणितातील प्रमेय,सूत्रे,व्याख्या, आकृत्या,नियम हे किती रंजक पद्धतीने सांगत.त्यामुळे गणित कधीच किचकट वाटलेच नाही.

     

     " जे जे आपणासी ठावे,

      ते ते इतरांशी शिकवावे.

      शहाणे करून सोडावे,

      सकळ जण."

      

      माझ्या सुदैवाने अनेक चांगले शिक्षक मला मिळाले,पण ज्यांनी विषयाच्या पलीकडे जाऊन काही दिले ते मात्र 'खेमनर सरच ' नेहमीच माझ्या स्मरणात राहिले.अचूक निर्णय घेण्याची क्षमता सरांनीच निर्माण केली .उंच भरारी घेण्यासाठी पंखांना माझ्या बळही दिले.सर कायम मार्गदर्शक,दिशादर्शक राहिलेत.अजूनही वयाच्या ७२ व्या वर्षीही सर शिकवण्यासाठी नेहमीच तत्पर असतात.कोणत्याही अडचणी लगेच सोडवतात.खोलवर ज्ञान देतात.शिकविण्यात त्यांचा चांगलाच हातखंडा आहे.सरांचा प्रत्येक वाढदिवस आम्ही मोठया हौसेने साजरा करतो.


         माझे गणिताचे प्रश्न

         विज्ञानाची ओळख

         मनातील अडचणी

         आलेल्या सर्व शंका,

         भविष्यातील अडचणी

         सोडवण्यासाठी केलेल्या

          प्रत्येक प्रयत्नांसाठी 

          तुमचे खूप खूप धन्यवाद !


९) विषय - आशेचा किरण

 

महाभयंकर या कोरोनाने

जगाची केली दैना

संपूर्ण जगात वाढली

जगण्याची सारी विवंचना !


जाऊ नका समुदायात

घात करेल तो तुमचा

घरात सुरक्षित बसता

दिसेल किरण आशेचा !


सॅनिटायझर लावून हातास

मास्कचा वापर करायचा

सामाजिक अंतराचा वापर

करता,दिसेल किरण आशेचा!


जे होते ते चांगल्यासाठीच

निघून जाईल परिस्थिती

मनी असावा ,आशेचा किरण

नियम सर्व पाळता, कसली हो भीती !


एक आशेचा किरण

पडतो भारताच्या भूवर

परतून लावू साथीला

मान उंचावू विश्वावर !


नुकतेच झाले संशोधन

कोरोनाची लस जीवनात

एक आशेचा किरण

विज्ञानाच्या या युगात !

________________________________________

१०) सांग ना यात माझ काय चुकलयं  


आता या दिवसांमध्ये मी माझी बनुन राहिले

जुन्या वह्या डायऱ्या अल्बम पुस्तकांमध्ये जाऊन रमले

त्या आठवणी वाचतांना माझ्या डोळ्यात अश्रू आले

मग, सांग ना यात माझ काय चुकलयं ||१||


मलाच आता माझ्या या दुःखातून बाहेर यायचे

मलाही मस्त स्वच्छंदी फुलपाखरा सारखं मस्त बागडायचे

आयुष्य थोडच हवंय पण प्रेम लावणारे जगायचे

मग, सांग ना यात माझ काय चुकलयं ||२||


मलाही नेहमी हसत हसत जीवन मस्त जगायचे

मलाही माझ्या छंदांना आता नवदिशा करून दयाचे

या अश्रूंना ही आता जीवनातून पुर्णपणे झिडकाराचे

मग, सांग ना यात माझ काय चुकलयं ||३||


मलाही माहिती मी खूप हट्टी अवखळ वागते

जगणे वागणे इतरांसारखे मला नाही पटत ते

पटेल तेव्हाच मी कोणतीही गोष्ट मान्य करते

मग , सांग ना यात माझ काय चुकलयं ||४||


मला माझा भुतकाळ पुसून भविष्यकाळ घडवायचा आहे

पण त्यासाठी वर्तमान काळ ही जगायचा आहे

याचसाठी स्वप्न पाहून ते पुर्ण करायचे आहे

मग,सांग ना यात माझ काय चुकलयं ||५||


प्रत्येकाला जीवन जगताना भावनिक आधारच हवा ना

तो मला हवा असणे हे साहजिकच ना 

जेव्हा मला खरच आधाराची गरज वाटतेय ना

मग,सांग ना यात माझ काय चुकलयं ||६||


तुला पाहिजे तेव्हा मी कायमच मदत केली

तुझे जीवन घडवण्यासाठी तू ही ती स्वीकारली

तुला त्या गोष्टींची आठवण ही नाही राहिली

मग,सांग ना यात माझ काय चुकलयं !

_______________________________________

११) हो, मी खुप खुश आहे


प्रारब्धामुळे जेव्हा मी अजून खूप खोल दुःखात डुबून जाते

तेव्हा ,मीच समजावते माझ्या मनाला 

हो,मी खुप खुश आहे ||धृ ||


आयुष्यातील काही सुखद गोष्टींचा विचार करून भूतकाळात जाऊन

पण ,तेव्हा हातात काहीच लागत नाही माझ्या (२)

तरीही नव्या उमेदीने जगण्याचा विचार करते

तेव्हा, मीच समजावते माझ्या मनाला 

हो,मी खुप खुश आहे ||१||


जीवन जगत असताना सोबत आहेत हव्या असणाऱ्या सर्व गोष्टी

दुचाकी,घर ,जागा आणि नोकरी माझ्या सोबतीला (२)

पण,तरी सुद्धा माझ मन त्यात काही रमत नाही

तेव्हा, मीच समजावते माझ्या मनाला,

हो ,मी खुप खुश आहे || २||


झोपायला मऊ मऊ गादी,सोबतीला आलिशान दिवाण, लोड आणि उशी

तरी, रात्र खायला उठते,तेव्हा शांत झोप येण्यासाठी(२ )

उघड्या फरशीवर,फक्त चटई टाकून झोकुन देते स्वतःला 

तेव्हा,मीच समजावते माझ्या मनाला

हो,मी खुप खुश आहे || ३||


कोरोनाच्या या महामारीमध्ये सगळीकडे सारा हाहाकार माजवला 

मनही लागत नाही,आता घरातल्या कोणत्याही कामात (२)

मग,वेळ चांगला जाण्यासाठी झोकुन देते स्वतःला आपल्या छंदात

तेव्हा,मीच समजावते माझ्या मनाला

हो,मी खुप खुश आहे ||४||


नऊ महिने पोटात वाढवलेला माझा अंश

जेव्हा बोलू लागतो,जीवन दोन घडीचा डाव,आज आहे तर उद्या नाही (२)

तेव्हा पाणवतात माझे डोळे, तेव्हा तो मोठ्यानं सारखे बोलू लागतो

तेव्हा, मीच समजावते माझ्या मनाला

हो, मी खुप खुश आहे ||५||


घरामध्ये सोबतीला सध्या मुलगा व मुलगी आहे

मार्च ते जुलै असे चार महिने सतत घरात राहून,काढले कसे दिवस (२)

एकमेकांना फक्त आनंद देण्याचा व घेण्याचा प्रयत्न करतोय

तेव्हा,मीच समजावते माझ्या मनाला

हो,मी खुप खुश आहे ||६||


जेव्हा एखाद्या छान कार्यक्रमानिमित्त मुलांना भेटवस्तू घेण्याची वेळ येते माझ्यावर

मुलगा बोलतो,तू इतरांना आतापर्यंत पैशांच्या स्वरूपात किती मदत केली,आहे का त्याचा काही हिशोब (२)

वरून सल्लाही देतो,त्यांना खरच पैसे देण्याची गरज होती का तुला ?

तेव्हा ,पिळ बसलेले माझे मन

मलाच समजावते 

हो,मी खुप खुश आहे ||७||

________________________________________

१२) सत्य स्व -अनुभव * 


        खूप दिवसापासून बोलु की नाही हे काही समजत नव्हते. मला नेहमी एक प्रश्न पडतो की, आपण माणूस म्हणून इतर व्यक्तींशी खरच माणसासारखे वागतो का ? हे माझ्यासमोर अजूनही खूप मोठे कोडे आहे ?आपल्या अशा रुढी - परंपरा कधी? कशा ? कोणी ? व का ?बनवल्या असतील .मुलगी किंवा सौभ्यागवती यांना जो मान मिळतो तो एखाद्या पती नसलेल्या 'स्री 'ला या भारतात का मिळत नाही? मान तरी का बोलायचे त्याला ?

      जिचा पती जातो, तो ही कोणाचा तरी मुलगा असतोच ना ?ज्याला तिने तर नऊ महिने आपल्या पोटात वाढविलेले असते ,जीवापाड सांभाळलेले असते, तरीही त्या आईला तिचा पोटचा गोळा गेल्यावर फक्त दहा दिवस 'कुंकू 'लावायचे नाही,इतकाच फक्त नियम .पण, दहाव्याच्याच दिवशी सूनेसामोर कुंकू लावून तिने मिरवायचे . माफी असावी,पण खरंच असे होते,आणि खरे बोलल्यावर मिरची झोंबतेच. पण ,जिचा पती गेला तिला आता आयुष्यभर 'कुंकू' किंवा टिकली लावायची परवानगी नाकारली जाते .

       जो पर्यंत तिच्या नवऱ्याला प्रत्यक्ष जाळत नाही, तो पर्यंत उठ सुठ प्रत्येक बाई तिला कुंकू लावते. तिला जणु मळवट भरून सजवतात.पण जेव्हा त्या पतीस जाळले जाते तेव्हा लगेच तिचे कुंकू इतर बायका पुसून टाकतात,बांगड्या असतील तर त्या काढल्या किंवा फोडल्या जातात,जोडवे पायातून काढून टाकून देतात, पायातील पैंजण काढून घेतात,गळ्यातील मंगळसूत्र काढून घेतात,नाकात जर सोन्याची मुरणी असेल तर ती किंवा मंगल सुत्रातील सोन्याचा मणी त्या मृत शरीराला वाहतात.

        तिने आता मंगळसूत्र घालायचे नाही,जोडवे घालायचे नाही,पैंजन घालायचे नाही,कुंकू किंवा टिकली लावायची नाही.कुंकू लावायचे असेल तर काळा बुक्का लावायचा,मंगळसूत्र घालायचे असेल तर ते ही वाट्या नसलेले व काळी मणी नसलेले,पैंजण,जोडव्याचे तर नावच घ्यायचे नाही.जर तिने असे कुंकू,टिकली,बांगड्या,जोडवी,पैंजण, मंगळसुत्र घातले की सगळ्या बायका तिच्याकडे एका विचित्र नजरेने पाहतात.त्यातील काही स्री विचारी आहेत.

     एक 'स्री 'च दुसऱ्या' स्री 'चा पदोपदी असा अपमान करते,व तिला त्यातच खरा आनंद मिळतो का? ती हे का लक्षात ठेवत नाही की ती ही कुंकू लावत होती तरी तिचा नवरा का देवाघरी गेला ?

      तू जीवंत राहावी म्हणून तुझा नवरा काय लावतो,काय घालतो? सगळ्या बेड्या तुझ्याच पायात का? तु जीवंत रहावी असे तुझ्या नवऱ्याला वाटत नाही का ?तो असे काही करत नाही तरी तू जीवंत आहेस ना? कधी तरी प्रत्येकजण जाणारच आहे.अमर कोणी असते तर जीवनाला अर्थच उरला नसता.सगळे देव आपल्या सोबत राहिले असते,त्यांना पाहता तरी आले असते का आपल्या डोळ्यांनी आपल्याला.कोणी स्टॅम्प पेपर वर लिहून देणार आहे का,माझा पती किंवा मी अजिबात मरणार नाही? आहो, देवाला ही ते चुकले नाही त्यांच्या पुढे आपण कोण ? कुठले? मेंदू दिलाय आपल्याला, त्याचा योग्य कामासाठी वापर करायचा बस.

     पती नसलेल्या स्रीला जर तुम्ही कुंकू लावले तर तिचा पती जीवंत होईल याची भीती वाटते का तुम्हाला ? कारण काय आहे याचे समजेल का ?

     तुम्हाला ,स्वतः ला खरच यातून सुख मिळते का? प्रत्येक स्री हे का समजून घेत नाही की या अनुभवातून प्रत्येकीला जावेच लागते. ती आधी जाईल किंवा तो आधी जाईल. दोघेही सोबत गेले तर सोन्याहून पिवळे त्या दोघांसाठी,पण मागे त्यांची मुले असतात त्यांनी कोणाकडे पाहायचे? कसे जगायचे? याचा विचार का होत नाही अजुन.

       पुर्वी ती 'स्री 'सती जात, तेव्हा सगळ्या त्रासातूनच तिची मुक्तता होत,जळताना तिला एकदाच तेवढा तो त्रास होत होता,पण नंतरच्या आतासारखा आयुष्यभरच्या त्रासातून ती मुक्त होती. खरंच, मग तेच जीवन चांगले होते का? हा ही प्रश्नच ना? आपण एकविसाव्या शतकात पाऊल ठेऊन काय उपयोग?

     अहो जेव्हा एखादीच्या पतीचा मृत्यू होतो तेव्हा त्या स्री ला तिचे अंतॆवस्त्र ही दुसऱ्या स्री ने घालून मग घालावे लागतात. नवीन अंतर्वस्त्र ही ती घालू शकत नाही. जुने असेल तर अडचण नाही,पण नवीन तिने काही परिधान करायचे नाही हा अलिखित नियम तिच्यासाठी.शिकलेल्या बायका ही तो पाळायला लावतात.

     पण त्याच स्रीला तिचा नवरा जाऊन एक वर्ष झाले की, मग सगळे नातेवाईक नवीन कपडे घेऊन येतात. त्यातही तिला पहिली नविन दिलेली साडी एका खालच्या जातीच्या बाईला द्यावी लागते.किती विरोधाभास हा? तेव्हा तिने दिवाळी साजरी करायची का नवीन कपडे घालून. पण त्या आधी तिला दुसऱ्यांनी घालून मग देतात कपडे घालायला .खरच का ओ एका वर्षात दुःख संपते का? त्याचा असा उत्सव करावा का? प्रत्येक महिन्याला एक उपासकरु घालायचा,गोडधोड पदार्थ बनवायचे.आणि 'वर्षश्राध्दाला ' तर आख्या गावाला गोडधोड जेवण घालायचे जणु काही पार्टीचाच आनंद. 

      तिला कोणत्याही पूजेला बसायचा अधिकार नसतो. तिच्या स्वतः च्या घराची पुजा सुध्दा ती करू शकत नाही? पूजेला बसायचा अधिकार हा समाज का देत नाही तिला ?

      तिच्याच मुलांच्या लग्नातही तिला तो अधिकार मिळत नाही ?' कुंकू ' म्हणजे सगळेच असेल तर ,जी ' स्री' कुंकू लावते तर तिच्या पतीने मरण पावायलाच नको ? यावर काही जणी अस तत्वज्ञान सांगतात की प्रत्येक स्री सावित्री सारखी पावित्र्यवान नाही? तिला याचे ही ध्यान राहत नाही की या कसोटीत ती स्वतः,तिची आई ,बहीण,मावशी,आजी,काकु,कोणी दूरची,जवळची,शेजारची एकही बाई पवित्र नाही असे समजते.फक्त सावित्रीच पवित्र होती का? ती तर आजच्या कोणत्याही स्री पेक्षा बुद्धिवान होती. सासुसासऱ्यांना नातवंडे दे असा वर मागितला तिने.पण तिच्या इतकी एकही बाई आता हुशार नाही का या विश्वात? तिने वडाच्या झाडाखाली नवऱ्याला ठेवले कारण काय तर तो सर्वात जास्त प्राणवायू देतो.आताचे व्हेंटिलेटरचे काम त्या काळात वडाच्या झाडाने केले व अजुन ही करत आहेच आणि करत राहणारच तो वड.

    बहीण,मावशी,काकु,आत्या, आजी,सासू,आई इत्यादी नाते राहतील. पण, तिला कोणाची पत्नी म्हणून हक्काने मिरवता, जगता येणार नाहीच का? कायम तिने विधवा हे लेबल घेऊनच जगायचे का?सगळ्या जबाबदाऱ्या तिने पूर्ण करायच्या, पण सतत अपमान सहन करूनच.स्वतः ला नेहमी कमी समजून आयुष्य काढायचे.अजुन किती दिवस हे असेच चालणार आहे.

    शिकलेली स्री सुध्दा तिचा विचार करू शकत नाही? अशिक्षित स्रीच तर मग काय ? तिचे हसणे,खेळणे सगळ्यांना मग खटकते.तिने मनसोक्त जगायचेच नाही का ?

     विधुर आहे असे म्हणताना कधी कोणी दिसत नाही? एक पुरुष दुसऱ्या पुरुषाला योग्य मान सन्मान देतो,पण तीच स्री दुसऱ्या स्रीचा अपमान करण्याची एक पण संधी सोडत नाही? बुद्धीची तरी किती किव करावी ? 

    का मुद्दाम असे वागतात त्या हेच मुळी समजत नाही? का प्रत्येक गोष्टीचा अनुभव घेतल्याशिवाय ती काय चुका करते हे समजणार नाहीच तिला?का आपला पती गेल्यावर आपल्याला असाच अनुभव यावा अशी तिची इच्छा असते का?

      स्वार्थी गोष्टी सोडून द्याव्यात .माणुसकी आता जरा तरी दाखवा.माणसे आहोत ,तर माणसाप्रमाणे वागावे इतकीच अपेक्षा करते .का प्रार्थना गाण्यापूर्तीच आहे 'माणसाने माणसासंग माणसासम वागणे.'

       विचार करावा जरा...करोना नंतर आपले जीवन कसे झाले? कसे होईल ? सांगू शकत नाही.खरंच वाटते की प्रत्येकाने स्वतः चांगल्याप्रकारे आयुष्य घालवा जगा व जगवा,हसा व हसवा. प्रत्येक गोष्टीचा अनुभव घेतलाच पाहिजे का?विषाची परीक्षा घेतल्यासारखे आहे हे.अशी वेळ कोणावरही येऊ नये.जीवन एकदाच मिळते ,ते आनंदाने जगावे व जगू द्यावे इतरांनाही. दुःखात सहभागी होता नाही आले तरी चालेल पण सुख त्यांचे असे ओरबाडून घेऊ नका.ईश्वर सगळे पाहत असतो हे ध्यानात ठेवावे.

    प्रत्येकाचा दागिना हा त्याचे विचार,आचार असतात.जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो प्रत्येकाचा.दिसते तसे असतेच असेही नाही.गुणांचे कौतक करा,मान द्या,मान घ्या. प्रेम द्या,प्रेम घ्या.चांगले आहे ते घेत जा,वाईट आहे ते टाकत जा.सुधारण्याचा प्रयत्न करा,संधी द्या,संधी घ्या.आयुष्य खुप सुंदर आहे.त्याचा आनंद घ्या.     

 _______________________________________

१३) # लॉक डाऊन आणि सर्वसामान्य जनता #

 

    कोरोना या महामारीमुळे संपुर्ण जगाला विळखा घातला आहे.त्यात आपला भारत ही आहेच .चीन मुळे सर्वांना खुप मोठी किंमत मोजावी लागत आहे. एका छोट्याश्या विषाणुमुळे  किती तरी लोकांवर आज उपासमारीची वेळ आली आहे.त्यात आपल्या देशाची लोकसंख्या ही खुप आहे.म्हणून खबरदारीचा उपाय म्हणून लॉकडाऊन करावे लागत आहे. एकदा नव्हे तर हे पाचवे लॉक डाऊन आहे.७०% जनता आपली ग्रामीण भागातील आहे.त्यांचे जीवन हे रोजच्या कामावर अवलंबून असते.

  लॉकडाऊनचा सगळ्यांनाच फटका बसला .पण सर्वात जास्त नुकसान हे सर्वसामान्य जनतेचे झाले आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गाला तोंड देण्यासाठी केंद्र सरकारने अचानक लॉकडाऊन जाहीर केल्यामुळे जनतेमध्ये गोंधळ आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले.गरीब जनता पण यात सतत भरडली जात आहे.

   भारतातील परिस्थिती अन्य देशांपेक्षा वेगळी आहे ,त्यामुळे अन्य विकसित देशांनी घेतलेला लॉकडाऊनचा पर्याय अवलंबणे आपल्याला अवघड जात आहे.आपल्याला या विषाणूंना आळा घालण्यासाठी वेगळा विचार करावा लागेल.आपल्या देशामध्ये रोजंदारीवर जगणाऱ्यांची संख्या जास्त आहे.छोटे कारखाने,कंपन्या,बांधकामे व इतर व्यवसाय पूर्णपणे थांबल्याने आपले गाव सोडून शहरात आलेले लोक मिळेल त्या मार्गाने परत आपल्या गावाकडे जाताना दिसत आहे.आज या वर्गाला आपल्या मदतीची गरज आहे आणि ती आपण केली पाहिजे. त्याच्या डोक्यावर छत,त्यांच्या बँक खात्यात काही रक्कम जमा केल्यास,खायला जेवण दिल्यास ते सध्या आहेत त्याच ठिकाणी सुरक्षित राहतील.अन्यथा शहरातून संसर्ग झालेले लोक गावाकडे गेल्यास हा विषाणू गावांमध्येही पसरेल. सध्या असेच चित्र पाहायला भेटते सगळीकडे कोरोनाने आपला मोर्चा वळवला आहे.

  असा किती तरी भाग आहे जेथे कोरोना म्हणजे काय हेच माहित नाही.फक्त इतकेच माहिती की कोणता तरी आजार आल्यामुळे सगळे बंद झाले आहे,इतकेच त्यांना कळले आहे.त्यांना काही जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी बाजारात जाता येत नाही,म्हणजे येऊ दिले जात नाही.खायचे काय? जगायचे कसे? होते ते संपले? आता किती दिवस हे चित्र असेच चालणार. त्यांना सर्वात जास्त जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा फार मोठ्या प्रमाणात जाणवत आहे.आजारी पडल्यावर दवाखान्यात उपचार घ्यायला कसे जायचे? स्वतः चे वाहनच नाही ना? बस, टेम्पो ,जीप ,ट्रक,लोकल इत्यादी वाहतूक व्यवस्था बंद आहे. या मुळे खुप जनांच्या नोकऱ्या गेल्यात.

       ' काम नाहीतर दाम नाही.'

  

    पैसाच नाही तर जगायचे कसे?प्रत्येक गोष्टीला पैसे मोजावे लागतात,पण तो पैसा ही जवळ नाही.जगायचे तरी कसे.

  सध्या लॉक डाऊन शिथील केल्यामुळे,काही कंपन्या, व्यवसाय, बांधकामे सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे.पण कामगार कपात करण्यात आली आहे. त्यामुळे बरेच मजूर,कामगार आता पुन्हा शहरात परतत आहे. आता आल्यावर घराचे भाडे,वेगवेगळे हप्ते,लाईट बिल,घरपट्टी, विमा योजना,गाड्यांचे हप्ते,मुलांच्या वह्यांचा खर्च,शालेय फी,किराणा बिल इत्यादींचा तगादा सुरू झाला आहे.काहींना अजुन ही काम मिळाले नाही.काम कधी मिळेल? खायचे काय? जगायचे कसे? असे विभिन्न प्रश्न भेडसावत आहे. हप्ते न भरल्यामुळे जप्ती आली. व्याजाने पैसे काढून कर्जे मिटवली. पण हे कर्ज पुन्हा फेडायचे कसे? मुलाबाळांना जगवायचे कसे ? बरेचसे कामगार अजुन गावीच अडकले ,त्यांना यायला साधनेच नाहीत. बऱ्याच वेळा जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी बाजारात जास्तीचे पैसे उकळले जातात. परराज्यातील कामगार रेल्वे ने महाराष्ट्रात दाखल झाले आहेत.पण आपल्याच राज्यातील कामगार गावी अडकून पडले आहेत शहरात येण्यासाठी प्रवासी साधने नसल्याने गावीच अडकले आहेत.अद्याप राज्यात एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात एसीटीची सेवा सुरू झालेली नाही.त्यामुळे गावी अडकलेल्या कामगारांनी शहरात यायचे तरी कसे,असा प्रश्न उपस्थित झाला आहे?

   पंतप्रधान योजनेतून गहू,तांदूळ, डाळी,तेल, कडधान्ये इत्यादीचे मोफत वाटप करण्यात येणार होते,पण तेही बऱ्याच ठिकाणी झालेले नाही.ते झाले तर कमीत कमी पोटाचा थोडा तरी प्रश्न सुटेल. सर्व सामान्य माणूस यामुळे हवालदिल झाला आहे.त्याचा विचार करणे गरजेचे आहे.प्रत्यक्ष अंमलबजावणी करावी. त्या सुविधांचा फायदा त्यालाच झाला पाहिजे, मध्येच खाणारे लोक असतात. ते ही आपल्यासारखी माणसेच आहेत.घरी काम करून त्यांना पगार नाही मिळत आपल्यासारखा.काम केले तर दाम. लॉकडाऊन आवश्यक आहे च पण या लोकांचे प्राण ही आवश्यक आहेतच. नोकरदार घरी बसून पैसे मिळवतात.त्यांचा पगार होतो.त्यांचे कुटुंब सुखी होते.पण सामान्य माणसाला ही अन्नाची गरज आहे,त्यासाठी त्याला कामाची गरज आहे,ते त्याला उपलब्ध करून द्यावे.म्हणजे तो ही सुखी समाधानी होईल.


Rate this content
Log in