माझे बालपण
माझे बालपण
विलक्षण आठवणींच्या हिंदोळ्यावर
चाळीतील बालपणीची रंगीबेरंगी चित्रे सजली
नातलगांच्या प्रेमळ,आपुलकीच्या सहवासात
सुंदर नक्षीदार फुलांची रांगोळी नटली १
चाळीतील अंगणात चाफ्याचा दरवळ
त्यावेळी जेवणाची अंगतपंगत रंगली
गच्चीवर पापड सांडगे चोरून खायचे
तरीही मित्रांची सोबत मदतीला धावली २
विटीदांडू,लगोरी,गोट्या,लंगडी, कॅरम
सारेच खेळ माझ्या भारी आवडीचे ठरले
पावसाळ्यात पाण्यात सोडायच्या होड्या
असे बालपण माझे सुखानंदाने भारले ३
दुपारी आवळे,चिंचा,बोरे,पेरू,कैरी तोडायचे
बर्फाचा गारगार गोळाही आवडीने खायचा
आणि विहिरीत डुबक्या मारत पोहायचे
व्हरांड्यात दुपारी मित्रांसोबत अभ्यास करायचा ४
शेजारच्या काकूंना फुले तोडून द्यायची
एकमेकांचा सांत्वनाने सांभाळ करायचा
ताईच्या लग्नाला तारांबळ सार्यांची
तेव्हा सर्वांच्याच डोळ्यात अश्रूंचा पूर यायचा ५
खेळांच्या नादाने व्यायाम चालायचा
मदतीची सवय सर्वांचा एकोपा दाखवायची
लहान वयातच दुसऱ्यांचा विचार मनात यायचा
अशी बालपणीची सवय लागली कायमची ६
असे माझे बालपण संस्कारांनी फुललेले
सायंकाळी शुभंकरोती म्हणतच बहरलेले
नात्यांचे रंगीबेरंगी धागे घट्टपणे विणलेले
आता मोठेपणी माणुसकीच्या आठवांनी भारलेले ७
