माझा भारत महान
माझा भारत महान
देश झाला स्वतंत्र माझा सत्तर वर्ष झाली
स्वातंत्र्य?अरे नीट वाच प्रिंट मीस्टेक असेल झाली
अहो अजूनही आपणास दोन घास गिळण्यासाठी निळ्या आभाळाची परवानगी घ्यावी लागतीये
अजूनही कर्जमाफी मिळत नाही म्हणून माझ्या शेतकऱ्याला आत्महत्या करावी लागतीये
अहो माझ्या काळ्या मातीची भूक अन निळ्या समुद्राची तहान तर अजून भागलीच नाहीये
कित्येक पंतप्रधान त्यांच्या नावाचा ठसा उमटवून गेलेत पण माझी अर्थव्यवस्था अजून वाटेला लागलीच नाहीये
रंग उडालेल्या भारताचा काळ्या मातीत तीन रंगांचा तिरंगा रोवलाय
अन जळालेल्या संविधानाच्या राखेचाच यांनी आज माथ्याला टिळक लावलाय
प्रगती,विकास करत करत आज माणूस इतका शिकला पण व्यापार व्यापार म्हणत म्हणत आपला संपूर्ण देश विकला
अहो श्रीमंती तर लाच देऊन अगदी स्वतंत्रपणे मोकाट फिरतीये
पण गरिबी अजूनही १९४६ पर्यंतच्या बेड्यांमध्ये झुरतीये
आजही कैदी भासणाऱ्या भारताला अगदी स्वतंत्र गृहीत धारतायत
गुन्हेगार खुशाल अभिमानानं अन मुलगी म्हणून जन्म घेतलेल्या पऱ्या चेहरे झाकून फिरतायत
भ्रमात राहू नका, घरांमधल्या गृहिणींनि बंधनमुक्त झाल्या म्हणून नाही तर गरज पडली म्हणून मेहनतीचा पदर खोचलाय
स्वातंत्र्य वैगैरे काही नाही नेत्यांमधल्या स्पर्धांमुळेच आज भारत इथपर्यंत पोहोचलाय
राजकारणाच्या नावाखाली सरकारनं सत्तेचा खेळ मांडलाय
काळा व्यापार स्वतंत्र झाला अन इमानदारीचा जीव कोंडलाय
अरे साठ टक्के तर सफल होऊ देत स्वछ भारत अभियान
निदान नजरेला नजर भिडवण्या इतकी तर होऊ देत माझ्या भारतीयांची मान
जेव्हा ताळ्यावर येईल हरवून गेलेलं ह्या भारत सरकारचं भान
मग मी खऱ्या अर्थानं आणि गर्वाने म्हणेन माझा भारत महान
