लहानपणीचा पाऊस
लहानपणीचा पाऊस
पुन्हा एकदा लहान व्हायचंय.....
धावत जाऊन कोसळणाऱ्या पावसात चिंब भिजायचयं
छत्री उलटी करून त्यात पावसाचं पाणी भरायचयं
आणि हळूच कोणावर तरी ते पाणी टाकून धूम पळायचयं
कोणाचे तरी गंबुट पायात घालुन बदकासारखं चालायचयं
आणि पुन्हा त्यात पाणी भरून ठेवायचयं
पाणी साचलेल्या खड्ड्यात धपकन उडी मारून
ते पाणी सर्वांवर उडवायचं
कागदाच्या होड्यांसाठी वह्यांची पानं पुन्हा फाडायचीय
साधी होडी, नांगर होडी बनवून त्यांना
पाण्यात काठीने लांबवर सोडायचयं
छत्री नाही तर रेनकोट घालून पावसाची मज्जा घ्यायचीयं
भिजल्यावर आईची प्रेमळ ओरडणी पुन्हा ऐकायचीयं
संध्याकाळी भजीच असं लाडीकपणे तिला सांगायचयं
परत एकदा लहान होऊन असं बालपण पुन्हा जगायचयं
