लेक
लेक
लाखात एक माझी
लेक आहे देखणी
तिला पाहुन चालती
रोज माझी लेखणी
लक्ष्मी म्हणून आली
माझ्या दारात
सोन्याच्या पावलांनी
हिंडती ती घरात
माझेच प्रतिबिंब
मी तिच्यात पाहते
तिची नटखट अदा
सारखे हसवत राहते
खाण्यात तिचा
रोजच नखरा
माराव्या लागतात तिच्या
मागे किती चकरा
चालता चालता
उगीच पडते
मला पकडून
तासभर रडते
बापाची तर असते
ती काळजाचा तुकडा
जास्तच चालतो तिचा
बापाजवळ नखरा
बापावर लेकीची
असते अफाट माया
बाप ही झिजवतो तिच्या
भविष्यासाठी काया
भावाच्या खोड्या
सहज काढते
शाळेचे कागद त्याचे
घेऊ घेऊ फाडते
नाही बोलला तो की
त्याच्यावर रागावते
चिडक्या स्वभावाने
धडाधडा मारते
दिवसभर नको ते
उद्योग ती करते
सारं सामान अख्ख्या
घरभर सारते
करून करून मस्ती
थोडीशी दमते
हळूच येऊन माझ्या
मिठीत झोपते
लेक माझी जवळ
खूपच गोड दिसते
माझं संपूर्ण थकवा
मी क्षणातच विसरते
प्रत्येकाच्या घरात
एक लेक असावी
सुख समृद्धीने घर ते
भरून दिसावी
