कविता
कविता
शब्दच हरवले आज माझे
सुचेना मजला काही
शब्दाविन कशी कविता
उमजत काही नाही
सूर्योदयाचा सूर्य पाहिला
पाहिली पूर्वेकडील लाली
सोनेरी सूर्य किरणे
अंगावर झेलून झाली
उमललेली फुले पाहिली
सुंदर पानांवरची नक्षी
गोड आवाजात गात होते
पहाटेला सारे पक्षी
वाऱ्यासंगे मस्त डोलती
हिरवे वृक्ष आणिक वेली
उडती फुलपाखरे रंगीबेरंगी
फुलेही दंवात न्हाली
नदी किनारी फिरता फिरता
बोलली पाखरासंगे
दगड भिरकाविता पाण्यामध्ये
उठली कित्येक तरंगे
रानोमाळी भटकून झाले
सूर्यास्तही आता झाला
आकाशी शोभून दिसतो
लाल सूर्याचा तो गोळा
अंधार दाटला आता आकाशी
चंद्रही हसतो गाली
गवसतील का शब्द माझे
माझी कविता साधी भोळी
