कर्तृत्ववान स्त्री
कर्तृत्ववान स्त्री
शब्दात मावशील तू
हे मिथ्य आहे सारे
तेज पाहुनी तुझे वाट
ही बदलतात वारे
अतिशय सक्षम, निर्भय स्वतःसाठी लढणारी तू
निर्धास्त, शांत तर कधी कठोरपणे पुढे जाणारी तू
रडता कोणी मायेच्या हाताने कुरवाळणारी तू
अत्याचार होता त्याच हाताने धडा ही शिकवणारी तू
हातात बांगड्यांचा
साज करणारी तू
संकट येतात त्याच हातात काठीही उचलणारी तू
संस्कृतीचा पदर सावरत
आधुनिकतेची
पैंजण चढवणारी तू
रूढीची बंधने तोडली तरी
माणुसकीची स्पंदने जपणारी तू
नावीन्याचा आरसा घेतानां सुद्धा
परंपरेचा गजरा माळणारी तू
आभाळासारखं
भव्य ललाट घेऊन
त्यावर सौभाग्याच कुंकू
जपणारी ही तू
पुरुषांच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून
प्रत्येक क्षेत्रात आज प्रगतीशील अशी रणरागिनी तू
विविध रूप तुझे प्रिया, सखी, सहचारिणी अर्धांगिनी ही तू
प्रत्येक सुख दुःखात
कुटुंबाला साथ देणारी
आयुष्याला परिपूर्ण अर्थ देणारी
निःस्वार्थ अशी
सहधर्मचारिणी ही तू
कल्पनेची भरारी तू
विश्व ज्याचे ऋणी
स्वर्ग बनविले सृष्टीस, पण हे जाणले ना कुणी...?
साथ प्रेमाची,
आपुलकीची तुझी सदैव
समजली ना तू कधी, हेच आहे एक दुर्दैव..?
सामर्थ्यवान, कर्तृत्ववान ,स्वाभिमानी,
आत्मविश्वासी
तुला माझा सलाम
ममतादायी, प्रेरणादायी, वात्सल्याचा
तुझ्या मज वाटे नेहमी अभिमान
