कृष्ण लीला
कृष्ण लीला
कृष्णा कृष्णा काय सांगू तुझ्या लीला !
खेळत आला जन्मापासून तू अद्भूतश्या लीला !
दारवान पेंगले कवाडे फाकली साखळी तुटली
वसुदेव घेउनी निघाला शिरी एक टोपली
झरझरा वाढली यमुनेच्या पाण्याची पातळी
पदस्पर्श होताच जाहली वाट तुझी मोकळी
कृष्णा कृष्णा काय सांगू तुझ्या लीला !
सुखरुपे पोचलास तू नंदाघरी गोकुळी !
वसुदेवासंगे योगमाया कारागृही परतली
सांगून गेली ती कंसाला काळ तुझा आला
कृष्णा कृष्णा काय सांगू तुझ्या लीला !
माती खाऊनी दाविले विश्व यशोदामाईला
कालिया मर्दन केले वध पुतनेचा केला
एका करांगुलीवरती गोवर्धनगिरी तोलला
इंद्राचाही गर्व गोपांसवे तूच हरण केला
कृष्णा कृष्णा काय स
ांगू तुझ्या लीला !
गोप गोपी नादविले केलीस नवनीत लूट
गोपाळाना केले खूष वाटूनि दहीकाला
मथुरेला जाऊनि कंस चाणूर वध केला
कृष्णा कृष्णा काय सांगू तुझ्या लीला !
पांडवांची केलीस साथ रक्षण धर्माचे केले
द्रौपदीस दिले अक्षयपात्र वस्त्रहरण थांबविले
शिशुपालासी अपराधांचे शासन घडविले
गीता सांगूनी अर्जुनास तूच धीट केला
कृष्णा कृष्णा काय सांगू तुझ्या लीला !
शिखंडीला धाडूनी समोर भीष्माला नमविले
हाच सुर्य हाचि जयद्रथ अर्जुनास दाखवला
भीमाला ते गुपित सांगुनी दुर्योधन वध घडवला
कर्णाचा रथ भूमीत रुतता ईषारा अर्जुनासी केला
कृष्णा कृष्णा काय सांगू तुझ्या लीला !
खेळत आला जन्मापासून तू अदभूतश्या लीला !