कोरोना
कोरोना
निसर्गाने काय हे आगळीक केलं
कोरोनाने सर्वांनाच अस्पृश्य केलं
सर्व मानवजात एकसमान आहे
पुन्हा पुन्हा स्पष्ट हे दृश्य केलं ||0||
आता विटाळाची दिशा एकतर्फी नाही
आता वर्णाची दशा एकतर्फी नाही
स्पर्शावर आधारित अमानुष क्रूर रूढी
पूर्वी होत्या तशा एकतर्फी नाही
शोषित पीडित समाजाच्या गाली
निर्माण समाधानकारक हास्य केलं
सर्व मानवजात एकसमान आहे
पुन्हा पुन्हा स्पष्ट हे दृश्य केलं ||1||
माणसाला माणसाची जाण नसावी
निसर्गाला हे पटणार कसं
माणसाने निर्माण केलेलं बंधन
माणसाशिवाय हटणार कसं
सरतेशेवटी निसर्गानं आता
उघड आपलं रहस्य केलं
सर्व मानवजात एकसमान आहे
पुन्हा पुन्हा स्पष्ट हे दृश्य केलं ||2||
आज स्पृश्याला अस्पृश्य टाळत आहे
जुनी जीर्ण परंपरा जाळत आहे
विज्ञानाचे नियम आता
स्पृश्य अस्पृश्य पाळत आहे
स्वच्छतेचे नियम पाळण्यास्तव
नष्ट सर्वांचं आलस्य केलं
सर्व मानवजात एकसमान आहे
पुन्हा पुन्हा स्पष्ट हे दृश्य केलं ||3||
