कन्यादान...!
कन्यादान...!
लेकीच्या येण्यानं घर सजलेलं असतं
तिच्या आवाजाने घराला घरपण असतं
आज तिच्या हाताला मेहंदीचा रंग बघून
तिच्या बाबाचं मन मात्र हळवं होत असतं...
लहानाची मोठी करत लाडक्या लेकीला
उत्तम संस्काराची शिदोरी कायमच भरली सोबतीला
मुलाप्रमाणे स्वातंत्र्य देऊन अभिमानाने वाढवत
आज सासरला पाठवणी करताना हात मात्र थरथरला...
आपल्या काळजाच्या तुकड्याला
दुसऱ्या कोणाचे होताना बघायचे
डोळ्यात पाण्याचे थेंब थांबवत
समोर ओठावर हसू दाखवायचे...
कितीही धीर-गंभीर असला तरी
त्या क्षणी त्याच्या काळजाला चिरा जातो
तिचा हात दुसऱ्याच्या स्वाधीन करताना
परत आपल्या लेकीला डोळे भरुन बघतो...
अंतरपाट धरीत आला तो हळवा क्षण
आता त्याची लेक झाली परक्याचे धन
लेकीचे पाणावले डोळे बघून मनी तुटे "बाबा"
आपल्या अश्रूंचा पूर लपवत करतो तिचे कन्यादान...!
