खरी मौज
खरी मौज
1 min
393
नववधूचा मंडप सजला
उधळल्या त्यावर श्रावणसरी
गवतफुलाच्या गादीवरती
फुलपाखरे नाच करी
वऱ्हाडी मंडळी जमली सारी
इवली नवरी बकुळ परी
चिंब न्हाली व्याकुळ वसुधा
स्वागतास सज्ज दरी
परिणयाच्या या रम्य घडीला
वेल वाकडा पाहे कसा
प्रेमिका सोडून चालली
विरह जाहला त्यास जसा
पानावरती दव ओथंबले
फुलांमधूनी थेंब तुटे
अमृत शिंपूनी माती भिजली
कस्तुरीचा गंध सुटे
आकाशाने छत्र धरले
मेघ बनले ढोलकरी
पाठवणीची घटिका आली
हसून रडले कोंब वरी
बालपण निघून गेले
रोपटे भासे वृक्षापरी
श्रावणाचा गंध मिसळला
जीवनात आली मौज खरी !
