काही सांगता येत नाही
काही सांगता येत नाही
कुणाचं मन कुठे हरवेल
काही सांगता येत नाही
हृदयाच्या हालचालीचे ठोकताळे
काही मांडता येत नाही ||0||
शेवटपर्यंत काही पक्का
अंदाज लागत नाही
आपल्याला कळेल गुपित
असं मन वागत नाही
हृदयावर टांगती तलवार
अशी टांगता येत नाही
हृदयाच्या हालचालीचे ठोकताळे
काही मांडता येत नाही ||1||
अचानक एक दिवस मग
बेचैन व्हायला लागतं
आता मात्र ते सीमेबाहेर
तुमच्या जायला लागतं
समाजाच्या विश्वात आता
त्याला रांगता येत नाही
हृदयाच्या हालचालीचे ठोकताळे
काही मांडता येत नाही ||2||
जीवनाचे नियमच एव्हाना
बदलून जात असतात
कोणत्याही संकल्पना इथे
कायमच्या नसतात
मन मारून अशा वेळी
काही वागता येत नाही
हृदयाच्या हालचालीचे ठोकताळे
काही मांडता येत नाही ||3||
सतत त्याच व्यक्तीचं
चित्र डोळ्यसमोर येतं
सतत तिच्या अवतीभवती
आपलं मन खेचून नेतं
तिच्याकडे तिचं प्रेमही
काही मागता येत नाही
हृदयाच्या हालचालीचे ठोकताळे
काही मांडता येत नाही ||4||
सतत विचार मनात तिचा
घोळत राहत असतो
बंद डोळ्यानेही तिला मी
स्पष्ट पाहत असतो
झोप नाही रात्रभर आणि
काही जागता येत नाही
हृदयाच्या हालचालीचे ठोकताळे
काही मांडता येत नाही ||5||
